वन ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी महाराष्ट्राची वेगाने वाटचाल: मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई: भारताने पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, यात महाराष्ट्राने मोठा वाटा उचलला पाहिजे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. राज्याची अर्थव्यवस्था ‘वन ट्रिलियन डॉलर’ करण्याचे उद्दिष्ट घेऊन, या दिशेने महाराष्ट्राची वेगाने वाटचाल सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत आशियाई पायाभूत सोयीसुविधा गुंतवणूक बँकेचे उपाध्यक्ष अजयकुमार पांडे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी फडणवीस यांनी आशियाई पायाभूत सोयीसुविधा गुंतवणूक बँकेला, २०१४ पर्यंत विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, ‘राज्यातील अनेक पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची कामे वेगाने सुरू असून, यासाठी आशियाई पायाभूत गुंतवणूक बँकेसारख्या संस्थांची मदत अपेक्षित आहे. बँक महाराष्ट्राच्या पाठीशी उभी असल्याचा आनंद आहे.’ राज्याच्या विकासाचा आराखडा अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन अशा तीन टप्प्यांत तयार करण्यात आला आहे. राज्यामध्ये नदीजोड प्रकल्पांची मोठी आखणी करण्यात आली असून, यासाठी नीती आयोग आणि वित्त मंत्रालयाला प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांना वित्त सहाय्य लागणार आहे. गंगा-नळगंगा-पैणगंगा नदीजोड प्रकल्पांचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असून, याचा फायदा केवळ शेतीलाच नव्हे, तर उद्योगांनाही होणार आहे.

राज्यात पाच नदीजोड प्रकल्प राबवण्यात येत आहेत. तसेच, पंप स्टोरेज योजनेच्या माध्यमातून एक लाख मेगावॉट ऊर्जानिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणता येईल, असे फडणवीस यांनी सांगितले. यामुळे विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार होऊन, राज्याचा विकास मोठ्या प्रमाणात होईल, असेही ते म्हणाले.
या बैठकीत अजयकुमार पांडे यांनी बँकेच्या आशिया आणि जगातील चालू असलेल्या प्रकल्पांविषयी माहिती दिली. राज्याच्या सुरू असलेल्या आणि भविष्यातील प्रकल्पांना मदत करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *