पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ स्थापन; शंभूराज देसाई यांची माहिती

राज्यातील पर्यटनस्थळांवरील पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि पर्यटन व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ (पर्यटन मित्र) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

राज्याचा निसर्गसंपन्न भूभाग, समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि ऐतिहासिक वारसा लक्षात घेता, पर्यटनस्थळांवरील सुरक्षिततेसाठी हे विशेष दल उपयुक्त ठरणार आहे. या दलामार्फत फक्त सुरक्षा पुरवली जाणार नाही, तर पर्यटकांना संबंधित स्थळाची माहिती, इतिहास, स्थानिक संस्कृती आणि नियमावली यांचाही परिचय करून दिला जाईल. या उपक्रमाची प्रायोगिक अंमलबजावणी २ ते ४ मे २०२५ दरम्यान सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे होणाऱ्या ‘महाबळेश्वर महोत्सव’ दरम्यान करण्यात येणार आहे.

पर्यटकांना सुरक्षिततेचा विश्वास वाटावा आणि आवश्यक माहिती सहज मिळावी, यासाठी पर्यटन पोलिसांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी राज्य सुरक्षा महामंडळ आणि मेस्को यांच्या कर्मचार्‍यांची यादी पर्यटन विभागाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शंभूराज देसाई यांनी विश्वास व्यक्त केला की, या उपक्रमामुळे शाश्वत पर्यटनाला चालना मिळेल, पर्यटनस्थळांचे संवर्धन होईल आणि स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. दलातील कर्मचारी विशेष प्रशिक्षण घेऊन पर्यटकांना योग्य मार्गदर्शन, सुरक्षा आणि आवश्यक ती मदत पुरवतील.पर्यटनस्थळी सीसीटीव्ही कॅमेरे, हेल्पलाइन सेवा, आणि त्वरित प्रतिसाद यंत्रणा उभारण्यात येणार आहेत. महाबळेश्वर महोत्सवातील यशस्वी अंमलबजावणीनंतर हे सुरक्षा दल राज्यभर विस्तारले जाईल. शासनाचा उद्देश या माध्यमातून १ लाख कोटी रुपयांची खासगी गुंतवणूक आकर्षित करण्याचा आणि १८ लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण करण्याचा आहे

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *