मुंबई: महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या जागी लवकरच नवीन राज्यपालांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. डॉ. शंकरदयाल शर्मा यांच्या नंतर उपराष्ट्रपती पदावर जाणारे ते महाराष्ट्राचे दुसरे राज्यपाल ठरू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. डॉ. शर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल असताना काँग्रेसने त्यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते आणि ते १९८७ ते १९८९ या काळात उपराष्ट्रपती राहिले.
सी.पी. राधाकृष्णन हे मूळचे तमिळनाडूचे असून, ते भाजपचे एकमेव खासदार म्हणून कोईम्बतूर मतदारसंघातून दोनदा लोकसभेवर निवडून आले आहेत. त्यांनी तमिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्षपदही भूषविले आहे. राजकारणात त्यांचा ‘अज्ञातशत्रू’ नेता म्हणून लौकिक आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांनी आतापर्यंत १ वर्ष १७० दिवस काम केले आहे. या काळात त्यांनी राज्यातील ३० जिल्ह्यांचा दौरा करून विकासकामांचा आढावा घेतला. विविध विषयांवर त्यांना उत्तम जाण असून, विशेषतः शेतकरी आणि ग्रामीण भागाविषयी त्यांना विशेष आत्मीयता आहे.
राजभवनवर विविध खात्यांचे अधिकारी आणि मंत्र्यांना बोलावून ते राज्याच्या विकासासंदर्भात बैठका घेत असत. राज्यपाल म्हणून येण्यापूर्वी ते फेब्रुवारी २०२३ ते जुलै २०२४ पर्यंत झारखंडचे राज्यपाल होते. मार्च २०२४ पासून जुलै २०२४ पर्यंत त्यांच्याकडे तेलंगणा आणि पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही होता.
सध्या महाराष्ट्रात नवीन राज्यपालांची नियुक्ती होईपर्यंत अन्य एखाद्या राज्यपालांना महाराष्ट्राचा प्रभार दिला जाईल किंवा थेट नवीन राज्यपालांची नियुक्ती केली जाईल अशा दोन्ही शक्यता वर्तविण्यात येत आहेत. सी.पी. राधाकृष्णन यांची पुढील वाटचाल उपराष्ट्रपती पदाच्या दिशेने असण्याची शक्यता असून, महाराष्ट्राला लवकरच नवे राज्यपाल मिळतील अशी चिन्हे आहेत.
Leave a Reply