राज्यातील शेती अधिक उत्पादक आणि खर्चिकदृष्ट्या किफायतशीर करण्यासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत सरकार आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवतानाच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर अनिवार्य ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रयोगात्मक स्वरूपात AI वापरण्याचा प्रस्ताव सध्या विचाराधीन आहे. या संदर्भात कृषी विभाग व सहकार विभागाने एकत्र येऊन या प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
कृषी क्षेत्रात AI वापराच्या अनुषंगाने उच्चस्तरीय बैठक
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात कृषी क्षेत्रात AI चा वापर करण्याबाबत महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे), सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि अखिल भारतीय द्राक्ष बागायत संघाचे अध्यक्ष कैलास पाटील यांसह महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
AI शिवाय शेती क्षेत्राचा विकास अशक्य!
जगभरातील उद्योग, आरोग्य, शिक्षणासह सर्वच क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर होत आहे. कृषी क्षेत्रही त्याला अपवाद नाही. बदलत्या हवामानाचा सामना, अवेळी पडणारा पाऊस, वारंवार होणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव आणि मजुरांची कमतरता यावर मात करण्यासाठी AI हा एकमेव उपाय आहे. या तंत्रज्ञानामुळे पीक आरोग्याचे सखोल विश्लेषण, मातीतील घटकांचे परीक्षण, तण व रोगांचे अचूक निदान, तसेच उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करता येणार आहेत, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
शेती अधिक फायदेशीर; खर्चात मोठी कपात!
AI चा वापर केल्याने शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळणार आहेत. उत्पादन वाढीसोबतच मजुरी खर्चात कपात, रसायनांच्या वापरावर नियंत्रण, कापणी कार्यक्षमतेत वाढ, रोगनियंत्रणाद्वारे अधिक बचत आणि पुरवठा साखळीतील कार्यक्षमतेत सुधारणा होणार आहे. कृषी क्षेत्रात हा तांत्रिक बदल मोठ्या प्रमाणावर राबविण्याची दिशा ठरवण्यासाठी राज्य सरकार सज्ज झाले आहे.
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा नवा अध्याय सुरू होणार.
Leave a Reply