मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना वगळता, महाराष्ट्रातील सर्व मंत्री आणि राज्यमंत्र्यांना वाय-प्लस सुरक्षा कवच प्रदान करण्यात आले आहे. या सुरक्षेसोबत एस्कॉर्ट वाहनांचीही सोय करण्यात आली असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.राज्याच्या विशेष संरक्षण युनिट (एसपीयू) च्या प्रोटोकॉलनुसार, गृहमंत्री असलेले फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना झेड-प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान केली जाते. सुरक्षेच्या गरजेनुसार आणि धोक्याच्या आकलनानुसार, राज्यातील ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्री यांना वाय-प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.
वाय-प्लस सुरक्षा म्हणजे काय?
यामध्ये ११ पोलिस कर्मचारी आणि एस्कॉर्ट वाहने असतात. प्रमुख राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा वारंवार आढावा घेतला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांना झेड-प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.
नव्या राजकीय परिस्थितीनुसार, बदललेल्या राजकीय समीकरणानुसार, काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. काहींचे सुरक्षा कवच पूर्णपणे काढण्यात आले आहे, कारण त्यांच्या जीवितास पूर्वीसारखा धोका नसल्याचे गुप्तचर विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्या गटातील काही आमदारांना वाढीव सुरक्षा देण्यात आली होती. त्यावेळी मंत्रिपद भूषवणाऱ्या काही नेत्यांना वाय श्रेणीची सुरक्षा देण्यात आली होती. राज्यातील व्हीआयपी सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर, मुंबई पोलिस संबंधित व्यक्तींच्या गरजेनुसार सुरक्षेचे फेरमूल्यांकन करतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Leave a Reply