महारेराकडून सुरक्षित अन् संरक्षित घर खरेदीसाठी मार्गदर्शक सूचना जारी

महारेराचे अध्यक्ष मनोज सौनिक यांनी स्पष्ट केले की, आम्ही नेहमीच गृहखरेदीचा कायदेशीर व आर्थिकदृष्ट्या सुरक्षित अनुभव देण्याचा प्रयत्न करतो. मात्र, प्रकल्पांच्या अंमलबजावणीदरम्यान काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. या अडचणी टाळण्यासाठी प्रत्येक प्रकल्पाच्या नोंदणीपूर्वी कठोर कायदेशीर, तांत्रिक व आर्थिक तपासणी केली जाते.
प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित सर्व माहिती महारेराच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाते. यामुळे गृहखरेदी प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण होते. याशिवाय, विक्रीकरारासाठी मानक मसुदा तयार करण्यात आला असून त्यात बिगरवळणीय अटी, वाटप पत्र, पार्किंग व सुविधांची सविस्तर माहिती समाविष्ट आहे. गृहखरेदीदारांनी ही सर्व माहिती तपासूनच गुंतवणूक करावी, असे आवाहन मनोज सौनिक यांनी केले आहे.

गृहखरेदीपूर्वी तपासायच्या गोष्टी

१. प्रकल्पाशी संबंधित खटले प्रलंबित आहेत का? त्यांची सद्यस्थिती व निकाल काय आहे?
२. प्रकल्पावर कोणतेही बंधने आहेत का?
३. प्रकल्पासाठी किती मजल्यांसाठी सुरुवात प्रमाणपत्र दिले गेले आहे?
४. स्थानिक नियोजन प्राधिकरणाकडून मिळालेली मंजुरी अंशतः आहे की पूर्ण बांधकामासाठी आहे?

महारेराने नोंदणीकृत प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रे

स्थानिक नियोजन प्राधिकरणाने मंजूर केलेला बांधकाम आराखडा
जमिनीच्या स्वामित्वाचा व शुद्धतेचा अहवाल
प्रकल्पाशी संबंधित सुरू असलेल्या खटल्यांची माहिती
बंधने असल्यास त्यांचा खुलासा
महारेराने मान्यताप्राप्त मानक करार व वाटप पत्र, ज्यात पार्किंग, सुविधा व सोयींचा समावेश आहे

गृहखरेदीदारांनी एकूण किंमतीच्या दहा टक्के रक्कम भरल्यानंतर विकसकाने मान्यताप्राप्त करारावर स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे. जर विकसकाने यास नकार दिला, तर गृहखरेदीदारांना महारेराकडे तक्रार नोंदविण्याचा अधिकार आहे.

महारेरा नोंदणीकृत प्रकल्पांची वैशिष्ट्ये

१. आर्थिक शिस्त: प्रकल्पासाठी गृहखरेदीदारांकडून मिळालेल्या रकमेपैकी सत्तर टक्के रक्कम फक्त प्रकल्पाच्या बांधकामासाठीच वापरणे बंधनकारक आहे.
२. पारदर्शकता: प्रकल्पाची सर्व माहिती महारेराच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
३. तिमाही प्रगती अहवाल: प्रकल्पाची प्रगती दर तीन महिन्यांनी सादर करणे अनिवार्य आहे.
४. तक्रार निवारण: गृहखरेदीदारांना तक्रारींसाठी महारेराकडे जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
५. प्रकल्पाचे निरीक्षण: गृहखरेदीदारांना प्रकल्पाच्या प्रगतीवर नजर ठेवता येते.
६. समान मोजणी: महारेराने निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्पेट क्षेत्रावर आधारित व्यवहारांची एकसमानता राखली जाते.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *