‘सकाळ माध्यम समूहा’ने राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त केलेल्या सर्वेक्षणातून महायुती सरकारच्या पायाभूत सुविधा विकासाबाबत महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आले आहेत. या सर्वेक्षणात विविध काळातील मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात किती आणि कशाप्रकारे पायाभूत सुविधांवर काम झाले, याबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यात आली. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात सर्वाधिक कामगिरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
सर्वेक्षणानुसार, फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने तब्बल ४२.७ टक्के काम पायाभूत सुविधा क्षेत्रात केले. फडणवीस यांनी त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळापासूनच या क्षेत्राला प्राधान्य दिले असून, रस्ते, पूल, मेट्रो, जलवाहतूक, स्मार्ट सिटी आदी प्रकल्पांना गती देण्यात आली. राज्यभरात सुरू असलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या प्रगतीमुळे नागरिकांनी या नेतृत्वाला सर्वाधिक गुण दिले.
दुसऱ्या क्रमांकावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने २४.६ टक्के कामे केली असल्याचे नागरिकांनी नमूद केले. त्यांच्या कार्यकाळातही रस्ते विकास, ग्रामीण पायाभूत सुविधा आणि मोठ्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीस चालना मिळाल्याचे सर्वेक्षणात दिसते.
याचबरोबर, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने २२.४ टक्के पायाभूत सुविधांची कामे केल्याचे निकाल सांगतात. तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वातील आघाडी सरकारने १०.३ टक्के कामगिरी नोंदवली. या सर्वेक्षणातून पायाभूत सुविधांबाबत नागरिकांच्या अपेक्षा आणि वेगवेगळ्या सरकारांची कामगिरी स्पष्ट झाली असून, राज्यातील विकास प्रक्रियेवर नेतृत्वाच्या शैलीचा थेट परिणाम दिसून येतो.


Leave a Reply