महायुती सरकारला जनतेची भीती? वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल!

मंत्रालयातील नवीन चेहरामोळख प्रणाली कार्यान्वित होताच पहिल्याच दिवशी गोंधळ उडाला. नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही उशिर झाल्याने लेटमार्क बसले. यावरून महायुती सरकारला जनतेच्या भेटीची भीती वाटते का? असा थेट सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

सुरक्षा की जनतेला अडवण्याचा डाव?
राज्य सरकारने मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक चेहरा पडताळणी आणि RFID कार्ड प्रणाली लागू केल्याचा दावा केला. १०,५०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे तपशील या प्रणालीत समाविष्ट करण्यात आले. मात्र, पहिल्याच दिवशी अनेक अधिकाऱ्यांचे चेहरे ओळखले न गेल्याने त्यांना सामान्य नागरिकांसोबतच रांगेत उभे राहावे लागले.

मंत्रालयात दलालांना मोकळा रस्ता, पण जनतेला बंदी?
विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर गंभीर आरोप करत म्हटले की, “शेतकरी, मजूर आणि सर्वसामान्य नागरिक आपली व्यथा मांडण्यासाठी मंत्री व सचिवांना भेटायला येतात. पण सरकारने त्यांच्यासाठी प्रवेश कठीण केला आहे. उलट, मंत्र्यांचे दलाल, कंत्राटदार आणि सत्ताधारी पक्षाच्या जवळच्या लोकांना सहज प्रवेश मिळतो! हे सरळसरळ अन्यायकारक असल्याने ही व्यवस्था त्वरित बंद करावी,” अशी मागणी त्यांनी केली.

सरकारची दिशाभूल आणि गोंधळ
सरकारने ही प्रणाली सुरक्षेसाठी असल्याचा दावा केला असला तरी वास्तवात ती जनतेला रोखण्यासाठी वापरली जात आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. “तालुका किंवा जिल्हा पातळीवर प्रश्न सुटत नाहीत म्हणून लोक थेट मंत्रालयात येतात. पण सरकार जनतेला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे,” असे ते म्हणाले.

सरकार जनतेपासून पळते आहे?
वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हा मुद्दा उपस्थित केला आहे. “महायुती सरकारला नेमकी कोणाची भीती वाटते? सामान्य जनतेची, की त्यांच्या प्रश्नांची?” असा घणाघात त्यांनी केला. सरकारने तातडीने हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *