सर्व इंद्रिये जिंकून झाला जो युवराज स्थिर
अहिंसेचा पुरस्कर्ता देई दुर्बलास धीर…
मानवधर्म आचारोनी केले विश्व मंदिर
नमितो मी चित्तविजयी भगवान महावीर !
इसवी सन पूर्व सहाव्या शतकातील महान प्रज्ञावंत भगवान महावीर आणि तथागत गौतम बुद्ध यांनी भारतीय विचारविश्वाला ज्ञानमार्ग दाखवून आपल्यावर फार मोठे उपकार केले आहेत. प्रस्थापित पराक्रमी राजघराण्यात जन्माला येऊनही, ते सत्तेच्या मस्तीत, भौतिक सुखांमध्ये किंवा राजकीय स्पर्धेत रमले नाहीत. या दोन्ही तरुण राजपुत्रांनी विचारांची, ज्ञानाची सांगड, आपल्या वर्तणुकीशी घालण्याचे फार मोठे काम केले. त्यांनी काल्पनिक पातळीवर असणारा धर्म विचार, माणसाच्या आचरणाशी जोडला. परिणामी जागतिक इतिहासात पहिल्यांदाच मानवी वर्तन सामूहिक पातळीवर संयमित होत गेलेले दिसले…
महावीर आणि गौतम बुद्ध या दोघांनी तिशीत असताना स्वतःला अध्यात्मिक साधनेत झोकून दिले. बोधप्राप्तीनंतर, मिळालेले ज्ञान स्वतः पुरते मर्यादित नठेवता, अर्हत महावीर सलग तीस तर तथागत बुद्ध पंचेचाळीस वर्षं पायी भ्रमण करत होते. श्रमण परंपरेची कास धरून, लोकभाषेत नीती- धर्म समजून सांगणारे हे दोन महापूरूष म्हणजे, भारतीय तत्त्वज्ञानातील स्वयंप्रकाशी तेजोमय चंद्र-सूर्य…
भगवान महावीर यांच्या आधीचे, तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथांनी सत्य, अस्तेय, अहिंसा व अपरिग्रह या चार तत्त्वांवर आपला धर्म उभारला होता. म्हणून तो चातुर्याम धर्म होता. महावीरांनी त्यात ब्रह्मचर्याची भर घालून त्याचे पंचयाम धर्मात रूपांतर केले. साधारणतः कोणत्याही क्षेत्रात नवीन विचार मांडताना, बर्याच वेळा जुनी परंपरा खंडित करुन नवीन व्यवस्था निर्माण केली जाते. पण सन्मति महावीरांनी तसे करण्याऐवजी नव्या तत्त्वांशी आपल्या ज्ञानाचा मेळ घालण्याचे ठरवले. म्हणूनच असेल कदाचित हा समन्वय साधणारे, कैवल्य जाणणारे महान विद्वान जैन धर्मात सर्वमान्य ठरले आहेत…
भारतीय लोक भलेही पैसा, पद, प्रतिष्ठा या त्रांगड्यात अडकले असतील. पण आजही अडीच हजार वर्षांनंतर अर्हत महावीर यांच्या शिकवणूकीचे विस्मरण झालेले नाही… आजही जैन साधक जो मंत्र म्हणतात…
णमो अरिहंताणं (मी अरिहंतांना नमन करतो)
णमो सिद्धाणं (मी सिद्धांना नमन करतो)
णमो आयरियाणं (मी आचार्यांना नमन करतो)
णमो उवज्झायाणं (मी उपाध्यायांना नमन करतो)
णमो लोए सव्व साहूणं (मी लोकातील सर्व साधू-साध्वींना नमन करतो)
हा नवकार मंत्र’ (नमोकार मंत्र) म्हणजे, पंचपरमेष्ठींना (अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय, साधू) यांना केलेला नमस्कार आहे. आपल्या विद्वत्तापूर्ण साधनेने उन्नत अवस्था प्राप्त करणार्या या पाच साधू, सिद्ध ते अरिहंत अशा पायर्या चढून कैवल्यपद प्राप्त करणार्या महान लोकांचे
नित्य स्मरण अत्यंत मंगलकारी मानले जाते. भलेही सर्वसाधारण जैन धर्म अनुयायी आयुष्यभर धन संपदा कमावण्याच्या प्रयत्नात राहील, पण त्याच्या ओठांवर मात्र नमोकार मंत्र असेल. एव्हढं सामर्थ्य या तीर्थंकर विचारांमध्ये आहे… अनुयायी सोईचे तेच घेतात, तो भाग वेगळा.
पण या मंत्राद्वारे कोणत्याही एका व्यक्तीची पूजा न करता, विचारांची त्यांच्या गुणांची पूजा करा, त्यांचे अनुकरण करा …
असे सांगणारा हा “ज्ञानमार्ग” चिरायू होवो…
भगवान महावीर जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा!
महेश म्हात्रे
संपादक
महाराष्ट्र रिसर्च सेंटर


Leave a Reply