मल्याळम चित्रपट दिग्दर्शक खालिद रहमान आणि अशरफ हमजा यांना हायब्रिड गांजा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाने कोचीतील एका फ्लॅटवर छापा टाकून त्यांना आणि त्यांचा मित्र शलीफ मोहम्मद याला अटक केली. या छाप्यात १.६ ग्रॅम हायब्रिड गांजा जप्त करण्यात आला. नंतर तिघांनाही जामिनावर सुटका करण्यात आली. घटना अशी घडली की, रविवारी पहाटे २ वाजता कोचीच्या गोश्री पुलाजवळील एक फ्लॅटवर उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या फ्लॅटचे मालक सिनेमॅटोग्राफर समीर थाहिर आहेत, आणि शलीफ मोहम्मद हा दिग्दर्शकांचा जवळचा मित्र असल्याचे सांगितले जात आहे. या छाप्याची माहिती गोपनीय होती, असे सूत्रांनी सांगितले.
खालिद रहमान हे ‘अलप्पुझा जिमखाना’ आणि ‘थल्लुमाला’ या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत, तर अशरफ हमजा ‘थमाशा’ आणि ‘भीमांते वाढी’ या चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत. या अटकेचे कनेक्शन मल्याळम अभिनेता शाईन टॉम चाकोच्या ड्रग्ज प्रकरणाशी जोडले जात आहे. उत्पादन शुल्क विभागाने २८ एप्रिल रोजी शाईन टॉम चाकोला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर काही दिवसांतच खालिद आणि अशरफ यांना अटक करण्यात आली. यापूर्वी १ एप्रिल रोजी, हायब्रिड गांजा विकल्याच्या आरोपाखाली थसलीमा सुलताना आणि के. फिरोज यांना अटक केली होती.
या प्रकरणात अभिनेता श्रीनाथ भासी यालाही नोटीस बजावण्यात आली होती. त्याचप्रमाणे सुलतान अकबर अली यालाही अटक करण्यात आली होती, जो या दोघांद्वारे ड्रग्ज पुरवण्याच्या आरोपाखाली अडकला आहे. शाईन टॉम चाकोला २१ एप्रिल रोजी ड्रग्ज वापरल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती, परंतु त्याच दिवशी त्याला जामिनावर सोडण्यात आले. कोची येथील एका हॉटेलमध्ये अंमली पदार्थांच्या छापेमारीदरम्यान शाईन टॉम चाको पळून गेला होता, आणि त्यानंतर चार तासांच्या चौकशीनंतर त्याची अटक करण्यात आली. सद्यस्थितीमध्ये, अभिनेता श्रीनाथ भासी यांनी केरळ उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती, परंतु त्याच दिवशी त्यांनी आपली याचिका मागे घेतली.


Leave a Reply