माळेगाव, पुणे: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘बळीराजा सहकार बचाव पॅनेल’ला मोठा धक्का बसला असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘निळकंठेश्वर पॅनेल’ने विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील मतमोजणीत शरद पवारांच्या उमेदवाराला अत्यंत कमी मते मिळाल्याने हा धक्का अधिकच स्पष्ट झाला आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गात शरद पवारांच्या उमेदवाराला फक्त २५१ मते
माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अनुसूचित जाती प्रवर्गातील एकूण ७,७२२ मतांपैकी शरद पवार यांच्या ‘बळीराजा सहकार बचाव पॅनेल’चे उमेदवार राजू भोसले यांना केवळ २५१ मते मिळाली आहेत. याउलट, अजित पवार यांचे उमेदवार रतन भोसले यांनी ३,९२६ मते मिळवून आघाडी घेतली आहे. तर विरोधी ‘सहकार बचाव पॅनेल’चे उमेदवार बापूराव भोसले यांना ३,५१० मते मिळाली आहेत. यामुळे अजित पवार पॅनेलचा उमेदवार ४१६ मतांनी आघाडीवर आहे. ही आकडेवारी शरद पवारांच्या पॅनेलसाठी चिंताजनक मानली जात आहे.
इतर मागास प्रवर्गातही अजित पवारांची आघाडी
इतर मागास प्रवर्गातील २,६८० मतांची मोजणी पूर्ण झाली असून, यामध्येही अजित पवार यांच्या ‘निळकंठेश्वर पॅनेल’चे नितीन शेंडे हे १९७ मतांनी आघाडीवर आहेत. विरोधी पॅनेलचे रामचंद्र नाळे पिछाडीवर आहेत. यामुळे सर्वच प्रमुख प्रवर्गात अजित पवारांचे पॅनेल आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
अजित पवार ‘ब’ वर्ग गटातून विजयी
या निवडणुकीचा पहिला निकाल ‘ब’ वर्ग गटातून जाहीर झाला असून, यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले आहेत. १०२ पैकी १०१ मते वैध ठरली असून, त्यापैकी अजित पवारांना ९१ मते मिळाली आहेत. सहकारी संस्था या गटासाठी मतदान करतात, ज्यात अजित पवारांनी बाजी मारली आहे.
माळेगावमध्ये क्रॉस व्होटिंगचा मुद्दा
माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवार ‘ब’ वर्ग गटातून विजयी झाले असले तरी, इतर उमेदवारांची धाकधूक कायम आहे. माळेगाव, सांगवी आणि पणदरे गटात क्रॉस व्होटिंग झाल्याचे बोलले जात आहे. मतपत्रिका छाननीनंतर मतमोजणी होणार असल्याने क्रॉस व्होटिंगचा फटका कोणाला बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अजित पवार पॅनेलचे रतनकुमार भोसले आघाडीवर आहेत, तर चंद्रराव तावरे यांच्या पॅनेलचे बाबुराव गायकवाड पिछाडीवर आहेत. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातही रतनकुमार भोसले आघाडीवर आहेत.
माळेगावसाठी चार पॅनेल रिंगणात
माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी २२ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीत अजित पवारांचे ‘निळकंठेश्वर पॅनेल’, शरद पवारांच्या नेतृत्वाखालील ‘बळीराजा सहकार बचाव पॅनेल’, भाजप नेते चंद्रराव तावरे-रंजन तावरे यांचे ‘सहकार बचाव शेतकरी पॅनेल’ आणि ‘कष्टकरी शेतकरी समिती’ तसेच अपक्षांचे एक पॅनेल असे एकूण चार पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात होते. या निकालांवरून अजित पवारांचे माळेगाव कारखान्यावरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे दिसून येत आहे.
Leave a Reply