पालघर : जिल्हा स्थापन होऊन दशक उलटलं असतानाही कुपोषण, बालमृत्यू आणि मातामृत्यूच्या समस्या कायम असल्याचं वास्तव पुन्हा समोर आलं आहे. जिल्ह्यात केवळ गेल्या सहा महिन्यांत तब्बल १३८ बालकांचा मृत्यू झाला असून, सध्या ८८५ बालके कुपोषणाच्या विळख्यात असल्याची आरोग्य विभागाची आकडेवारी धक्कादायक आहे.
या कुपोषित बालकांपैकी ६३ मध्यम कुपोषित तर २२ तीव्र कुपोषित आहेत. झाडर, मोखाडा, वसई, तलासरी आणि दहाणू या तालुक्यांमध्ये सर्वाधिक बालमृत्यूंची नोंद झाली आहे. स्थानिक आरोग्य व्यवस्थेवर त्यामुळे मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
पालघर जिल्हा निर्मितीनंतर अनेक आरोग्य सुविधा, पोषण आहार योजना आणि शासकीय उपाययोजना राबवल्या जात असल्या तरीही ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसत नाही. पावसाळ्यात उद्भवणारे आजार, पोषण आहाराचा अभाव, तसेच आरोग्य केंद्रांपर्यंत वेळेवर पोहोचता न येणं — हे घटक अजूनही कुपोषणाच्या मूळ कारणांपैकी आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता चौधरी यांनी सांगितलं की, “बालमृत्यू आणि कुपोषणावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून सर्व स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत.” तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कैलास हेदाळकर यांनी सांगितलं की, “बालकांच्या पोषणासाठी आवश्यक सर्व उपाययोजना राबवल्या जात आहेत.”
दरम्यान, गेल्या सहा महिन्यांत झालेल्या १३८ मृत्यूंसह या वर्षी आतापर्यंत २१४ बालकांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. ही परिस्थिती पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील पोषण आणि आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते.
पालघर जिल्हा निर्मितीला दशक उलटलं असलं तरी आरोग्याच्या मूलभूत सुविधा आणि पोषण आहाराच्या उपलब्धतेत सुधारणा न झाल्यास कुपोषणाची साखळी तुटणं कठीण आहे.


Leave a Reply