महाबळेश्वरमध्ये पर्यटक तरुणीचे छायाचित्रे चोरीछुप्या पद्धतीने काढणाऱ्या इसमास अटक; मोबाईलमध्ये अडीच हजाराहून अधिक तरुणींचे फोटो आढळले

महाबळेश्वरच्या मध्यवर्ती बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या पर्यटक तरुणीचे चोरीछुप्या पद्धतीने छायाचित्रे काढल्याप्रकरणी पोलिसांनी मालेगाव येथील ४० वर्षीय तौफिक इस्तियाक अहमद याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केलेल्या मोबाईलमध्ये तब्बल २,५०० हून अधिक तरुणींचे छायाचित्रे साठवलेली आढळून आली असून, या गंभीर प्रकरणी न्यायालयाने अहमदला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. प्राप्त माहितीनुसार, पुण्यातील एका तरुणीने आपल्या कुटुंबासह शनिवार, ६ एप्रिल रोजी महाबळेश्वरला पर्यटनासाठी भेट दिली होती. सायंकाळच्या सुमारास बाजारपेठेत खरेदी करत असताना, तौफिक अहमद नामक व्यक्ती तिच्या परवानगीशिवाय तिचे फोटो मोबाईलमध्ये टिपत असल्याचे तिच्या लक्षात आले. यामुळे घाबरलेल्या तरुणीने रडत रडत हा प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला.

 

कुटुंबीयांनी तात्काळ महाबळेश्वर पोलिस ठाण्यात जाऊन माहिती दिल्यानंतर, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तौफिक अहमद आणि त्याच्यासोबत असलेल्या चार साथीदारांना ताब्यात घेतले. पुढील तपासात पोलिसांनी आरोपीच्या मोबाईलची तपासणी केली असता, वेगवेगळ्या तरुणींचे अडीच हजारांहून अधिक फोटो त्यामध्ये आढळून आले. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांना अधिकृत तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले. मात्र, कुटुंबीयांनी तक्रार नोंदवण्यास नकार देत, केवळ मोबाईलमधून फोटो हटवण्याची विनंती केली आणि नंतर हॉटेलमध्ये परतले.

 

घटनेची माहिती परिसरात पसरल्यानंतर स्थानिक नागरिक संजय पिसाळ आणि सचिन वागदरे यांनी पोलिस ठाण्यात जाऊन या गंभीर प्रकारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अखेर संशयिताविरुद्ध अधिकृत गुन्हा नोंदवला. पोलिसांच्या माहितीनुसार, सदर प्रकार महिलांच्या गोपनीयतेचा स्पष्ट भंग करणारा असून, महाबळेश्वरसारख्या पर्यटनस्थळी महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तो अत्यंत गंभीर आहे. अहमदसोबत अटक करण्यात आलेले चारही साथीदार मालेगावचे रहिवासी असल्याचेही निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *