मराठा आरक्षणाच्या निर्णायक लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक! मुंबईकडे कूच करण्याचा इशारा

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुंबईकडे कूच करण्याचा इशारा देत ठाम भूमिका मांडली आहे. “ही शेवटची लढाई असेल. आता आम्ही मुंबई गाठणार आणि आमची ताकद दाखवणार,” असे त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनाच्या पुढील दिशेबाबत बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “सध्या तीव्र उन्हामुळे थोडा वेळ शांत आहोत. नाहीतर आताच आमची ताकद दाखवली असती. मागच्या वेळी मुंबईला जाऊन शांतपणे परत आलो, पण तेव्हाही आम्ही सरकारला झटका दिला होता. आता आमच्या गरीब शेतकऱ्यांनीही मुंबई पाहावी, असा आमचा विचार आहे. मात्र, पुढील पावले कोणती असतील, हे उघड करणार नाही.”

“मुख्यमंत्र्यांनी हे लक्षात ठेवावे की, आम्ही आरक्षण मिळवणारच. काही काळ शांत राहतो, पण योग्य वेळी सरकारला अशा प्रकारे घेरू की कोणताही मार्ग सुचणार नाही. सरकार फक्त निवडणुकीपर्यंत आश्वासने देत आहे, पण आम्ही आता अचानक आंदोलन छेडणार,” असा इशारा त्यांनी दिला.
“सरकारने गोड बोलून आम्हाला फसवले, पण आम्ही मागे हटणार नाही. आमचे आंदोलन संपूर्णतः लोकशाही मार्गानेच होईल, मात्र ही अंतिम लढाई असेल. आम्ही आरक्षण मागत आहोत म्हणून आम्हाला जातीवादी म्हणू नका. उलट, आमच्या हक्काच्या आरक्षणाला विरोध करणारेच खरे जातीवादी आहेत. सरकारने आमची शंभर टक्के फसवणूक केली आहे,” असा आरोप त्यांनी केला.

“आम्हाला ओबीसी आरक्षणात समाविष्ट व्हायचे होते. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेली अधिसूचना सरकारने वेळेत काढली नाही, त्यामुळे आम्हाला अन्याय सहन करावा लागला. ही सरळसरळ फसवणूक आहे,” असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली. मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, मराठा आरक्षणासाठी आता निर्णायक संघर्ष केला जाईल. सरकारला अनपेक्षित ठेवत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *