धाराशिव : मराठा आरक्षणासाठी सातत्याने आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता ‘चलो दिल्ली’चा नारा दिला आहे. धाराशिवमध्ये हैद्राबाद गॅझेट संदर्भातील बैठकीत त्यांनी ही घोषणा केली. देशभरातील मराठा बांधवांना एकत्र आणण्यासाठी दिल्लीत मोठं अधिवेशन घेण्यात येणार असून लवकरच त्याची तारीख जाहीर होणार आहे.
जरांगे पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अटकपासून कटकपर्यंत मराठेशाहीचा झेंडा फडकावला होता. त्याच धर्तीवर आज देशभरातील मराठा बांधव एकत्र आले पाहिजेत. महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, गोवा आणि दिल्ली या राज्यांमध्ये पसरलेल्या मराठा बांधवांना या अधिवेशनातून एकत्र आणण्याचा प्रयत्न होणार आहे. “हा एक आनंद सोहळा, सुवर्णदिवस ठरणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
हैद्राबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीनंतर अधिवेशन होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी दिल्लीतूनही ठोस आवाज उठवला जाईल,” असे जरांगे म्हणाले. त्यांनी अधिवेशन मागण्यांसाठी नाही, तर ऐक्यासाठी असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यात अजूनही तणाव कायम आहे. ओबीसी समाजाने मराठ्यांना ओबीसी आरक्षण नको अशी भूमिका घेतली आहे. सरकारनं हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे जरांगे यांच्या दिल्ली घोषणेने एकीकडे मराठा समाजात उत्सुकता वाढली असली, तरी राजकीय व सामाजिक वातावरणात नवा कलाटणी देण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.हे दिल्लीत होणारे अधिवेशन मराठा समाजासाठी एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply