अहमदाबाद : शुक्रवार, १३ जून २०२५: अहमदाबादमध्ये गुरुवारी (१२ जून २०२५) झालेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या ‘बोइंग ७८७-८ ड्रीमलायनर’ या प्रवासी विमानाचा सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणानंतर काही मिनिटांतच मेघानीनगर भागातील नागरी वस्तीवर अपघात झाला. या अपघातात २४२ पैकी २४१ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, केवळ एक प्रवासी सुदैवाने वाचला आहे. केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांनी रुपाणी यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
विजय रुपाणी हे लंडनमध्ये आपल्या मुलीला भेटण्यासाठी जात होते. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. या अपघातातील मृतांमध्ये १६९ भारतीय, ५२ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिकाचा समावेश आहे. या दुर्घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
भारतात याआधीही अनेक बड्या नेत्यांनी गमावलाय विमान अपघातात जीव: विजय रुपाणी यांच्या निधनामुळे देशातील विमान अपघातांच्या इतिहासातील अनेक दुःखद घटनांची आठवण झाली आहे, ज्यात अनेक बड्या नेत्यांनी आपले प्राण गमावले. काही प्रमुख उदाहरणे खालीलप्रमाणे:
● जनरल बिपीन रावत (२०२१): भारताचे पहिले CDS जनरल बिपीन रावत यांचे कुन्नूर (तामिळनाडू) येथे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. त्यांच्यासह पत्नी मधुलिका रावत यांचाही मृत्यू झाला.
● दोरजी खांडू (२०११): अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे ३० एप्रिल २०११ रोजी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. त्यांचे पवन हंस हेलिकॉप्टर जमिनीवरील नियंत्रणाशी संपर्क तुटल्याने अपघातात पडले आणि पाच दिवसांनी अवशेष सापडले.
● वाय. एस. राजशेखर रेड्डी (२००९): आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांचे २ सप्टेंबर २००९ रोजी खराब हवामानामुळे नल्लामला जंगलात हेलिकॉप्टर कोसळून निधन झाले.
● ओ. पी. जिंदाल आणि सुरेंद्र सिंग (२००५): प्रसिद्ध उद्योगपती आणि हरियाणाचे ऊर्जामंत्री ओपी जिंदल आणि कृषीमंत्री सुरेंद्र सिंह २००५ मध्ये हेलिकॉप्टर अपघाताचे बळी ठरले. त्यांचे किंग कोब्रा हेलिकॉप्टर दिल्लीहून चंदीगडला जात असताना, उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे अपघात झाले.
● माधवराव सिंधिया (२००१): देशाचे माजी रेल्वेमंत्री माधवराव सिंधिया यांचे ३० सप्टेंबर २००१ रोजी कानपूर येथे एका राजकीय रॅलीला जात असताना विमान अपघातात निधन झाले होते.
● संजय गांधी (१९८०): इंदिरा गांधी यांचे पुत्र आणि काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते संजय गांधी यांचेही २३ जून १९८० रोजी विमान अपघातात निधन झाले होते.
● होमी जहांगीर भाभा: देशातील महान शास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा यांचेही एअर इंडियाच्या विमान अपघातात निधन झाले होते.
या दुःखद घटना भारताच्या इतिहासात नेहमीच स्मरणात राहतील. विमान अपघातांमध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत, ज्यात राजकीय नेते, सैनिक आणि सामान्य नागरिकही आहेत. अहमदाबादमधील या ताज्या घटनेमुळे हवाई सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.


Leave a Reply