मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत पुन्हा एकदा बिघाड झाल्याचे समोर आले आहे. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेत भाषण करत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काही क्षण भाषण थांबवल्यानंतर त्यांनी पुन्हा बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र सभेनंतर त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलविण्यात आले.
बीडमध्ये शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, केमिस्ट, वकील, अभियंते आणि कर्मचारी संघटनांच्या संयुक्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मनोज जरांगे पाटील आणि धनंजय देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते. भाषणाला सुरुवात केल्यानंतर काही वेळातच जरांगेंना अस्वस्थ वाटू लागले. “मला शब्दही फुटत नाही…” असे भावनिक उद्गार त्यांनी काढत भाषण अर्धवट सोडले. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा बोलण्याचा प्रयत्न केला.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सभेत वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. मनोज जरांगे पाटील आणि धनंजय देशमुख व्यासपीठावर गहिवरले. संतोष देशमुख यांच्या दुर्दैवी मृत्यूचा उल्लेख करताना उपस्थितांमध्ये हळहळ व्यक्त झाली. “समाजाच्या एका लेकराला इतका अन्याय सहन करावा लागला…” असे म्हणताच धनंजय देशमुख भावुक झाले आणि अश्रू अनावर झाले. दोषींना फाशीची शिक्षा मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
सभेनंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आणखी बिघडली. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या बीडमधील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
Leave a Reply