दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी चेंबर ऑफ कॉमर्सने मराठी उद्योजकांसाठी चीनमधील जागतिक व्यापार प्रदर्शनात सहभागी होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. विशेषतः भव्य कॅन्टोन फेअर सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनांमध्ये व्यवसाय संधी शोधण्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. २००८ पासून हजारो उद्योजकांना लाभ मराठी चेंबर ऑफ कॉमर्स २००८ पासून हाँगकाँग आणि चीन व्यापार सहलींचे आयोजन करत असून, आजवर हजारो मराठी उद्योजकांनी याचा लाभ घेतला आहे, असे चेंबरचे कार्याध्यक्ष मनोहर पेडणेकर आणि संघटन कार्यवाह स्वप्नील राणे यांनी सांगितले. १२ एप्रिल ते १९ एप्रिल २०२५ या कालावधीत होणाऱ्या या व्यापार दौऱ्यात केवळ २५ मराठी उद्योजकांना सहभागी होता येणार आहे.
चीनमधून भारतात अनेक तयार उत्पादने आणि इतर साहित्य आयात केले जाते. त्यामुळे नवीन संधी शोधणाऱ्या तरुण आणि मराठी नवउद्योजकांसाठी कॅन्टोन फेअर हा उत्तम पर्याय आहे. तब्बल ५९,००० हून अधिक प्रदर्शन दालनांसह हे जागतिक स्तरावरील सर्वांत मोठ्या व्यापार मेळ्यांपैकी एक आहे. यंदा या मेळ्याचे ६७ वे वर्ष आहे.
जरी चीन हा जागतिक व्यापारात अग्रस्थानी असला, तरी तेथील कामगार खर्च वाढत असल्याने आणि बदलत्या आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणांमुळे अनेक मोठ्या कंपन्या उत्पादन बंद करत आहेत. याउलट, भारताचे सुधारित व्यापार धोरण, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि वाढती बाजारपेठ ही नवउद्योजकांसाठी नवीन संधींचे दार उघडत आहे.


Leave a Reply