मराठी पत्रकार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

आज दि.६ जानेवारी २०२४. आजच्याच दिवशी, १९३ वर्षांपूर्वी,१८३२ साली आद्य संपादक बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठी आणि इंग्लिशमध्ये छापले जाणारे वृत्तपत्र सुरू केले. तो दिवस आपण सारे मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करतो.
स्वातंत्र्यपूर्व काळात मराठी पत्रकारितेने भारतीय समाजात प्रबोधन पर्व सुरू केले. त्यानंतर हिंदी पत्रकारितेची सुरुवात देखील, १९२० मध्ये बाबूराव पराडकर या मराठी भाषिक संपादकांनी केली होती. पुढील काळात लोकमान्य टिळक यांच्या केसरीच्या आक्रमक माध्यमातून, ‘सुधारक’कार आगरकर यांच्या वैचारिक चिंतनातून, डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक, प्रबुद्ध भारत मधील घणाघाती लिखाणातून मराठी समाज आणि पत्रकारिता जागृत आणि विकसित होत गेले. त्यामुळेच संयुक्त महाराष्ट्र आंदोलनादरम्यान आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे आदी संपादकांनी मराठी लोकांना एकत्र आणले आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आकारास आला. असा हा महाराष्ट्र फक्त वैचारिक दृष्टिकोनातून पुढारलेला नव्हता, तर तो सबंध देशात सहकार, उद्योग, शेती, वीज उत्पादन, फळे उत्पादन अशा सर्वच क्षेत्रात पुढे होता….
आज काळ बदलतोय, गुजरात, उत्तर प्रदेश सारखे राज्य आपल्या पुढे जात आहेत. आणि आम्ही मराठी पत्रकार फक्त पाहतोय. राज्यातील राजकारण जास्तीत जास्त अस्थिर रहावे, यासाठी गेल्या काही वर्षांत पत्रकारच जास्त सक्रिय झालेले दिसताहेत. हे कशाचे लक्षण आहे? आज सामाजिक स्वास्थ बिघडले आहे. ते दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करणे राहिले बाजूला, पण आम्ही नको त्या बातम्यांना अती महत्त्व देऊन, समाज अधिकाधिक अस्वस्थ होईल, अशा कृती करतो. खास करून आज राज्यात जे “डिजिटल चॅनल” नामक स्वयंघोषित माध्यमांचे अफाट पीक आले आहे. त्याचे काय करावे, याचे भान पत्रकारितेला नेतृत्व देणाऱ्या मंडळींना देखील नाही. आणि मोठ्या वृत्तपत्र समूहातील बातमीदार – संपादकांना जे जाहिरातींचे “टार्गेट” दिले जाते, त्याला कसा आवर घालावा, याचे उत्तर भल्या भल्या विचारवंताकडे नाही. परिणामी, गेल्या दशकात मराठी पत्रकारिता आपला दर्जा, आपली प्रतिष्ठा गमावताना दिसली. मग भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सहजपणे ” पत्रकारांना आपल्या बाजूने ठेवण्यासाठी त्यांना रोज धाब्यावर घेऊन जा ” असे जेव्हा बोलून जातात, तेव्हा आम्हाला राग येतो. पण बावनकुळे असे का म्हणाले, याचा पत्रकार का विचार करत नाहीत, हा माझा प्रश्न आहे.
आज राज्यातील मोठ्या समूहात काम करणारे पत्रकार – संपादक यांनाही जर काळानुरूप बदलत असलेले आपले काम अधिक चांगले करण्यासाठी नवीन कौशल्ये शिकवणारा “रिफ्रेशर कोर्स” देण्याची पद्धत नाही. मग गावखेड्यात विखुरलेल्या असंघटित बातमीदार बांधवांचे काय घेऊन बसलात? ते बिचारे आपआपल्या ताकदी नुसार, तन मन धनाने पत्रकारितेची सेवा करत असतात. त्यांच्यातील चार – सहा हुशार, टोळीबाज मस्त मेवा मिळवणारे असतात. नाही, असे नाही. पण त्यांच्यामुळे, हे उरलेले लोक फुकट बदनाम होत राहतात.
परिणामी, आज मराठी पत्रकारितेतील लिखाण अशुध्द असते, माहिती अपुरी किंवा एकांगी दिसते, विषयाचे ज्ञान अर्धवटअसणे हे तर सर्रास पाहायला मिळते. परिणामी मराठीतील बातमी किंवा लेख वाचताना, टिव्ही वर पाहताना मनाचे समाधान होत नाही . परिणामी, आज आमच्या घरातील तरुणाई इंग्रजी पेपर / चॅनल कडे वळलेले आहेत. आणि माहितीसाठी आसुसलेला ज्येष्ठ वर्ग हिंदी चॅनल पाहायला लागलाय. याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालंय.

सध्या राज्यातील बहुतांश मराठी शाळांची अवस्था, गुणवत्ता आणि हजेरी या तिन्ही गोष्टी पार रसातळाला गेल्या आहेत. परिणामी मराठी शाळा बंद होऊन, गाव खेड्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळा वाढताहेत. हिच स्थिती जर आणखी काही वर्षे सुरू राहिली, तर “अभिजात मराठी” फक्त बोली भाषा राहील. याचा विचार राज्यकर्त्या वर्गाआधी मराठी पत्रकारांनी केला पाहिजे. असे आज बाळशास्त्रीं यांचे स्मृतिस्मरण करताना सांगावेसे वाटते . कारण ती पत्रकार म्हणून आपली जबाबदारी आहे. मित्रहो तुम्हीच ठरवा,
समाजात सकारात्मक उर्जा निर्माण करून, प्रगतीशील महाराष्ट्र अधिक गतीमान व्हावा याची पत्रकार म्हणून आपल्यावर देखील जबाबदारी नाही का ?
बदलत्या तंत्रज्ञानाने आजच्या आधुनिक ज्ञान युगात जे नवे स्थित्यंतर आणले आहे. ते प्रचंड आव्हानात्मक आहे. स्थळ-काळाच्या मर्यादा भेदणारा अतिविशाल सोशल मीडिया, हा शाप ही ठरतोय आणि वरदान देखील. त्याची भाषा शिकून, तो आपण कसा वापरतो यावर आपले, मराठी समाजाचे, पर्यायाने मराठी पत्रकारांचे भवितव्य ठरणार आहे . तिच गोष्ट इंटरनेटवरील माहितीच्या विपुलतेची. अकारण येवून आदळणार्‍या या अफाट माहितीने भल्या भल्यांची मती गुंग केली आहे. या तंत्र तंद्रीतून बाहेर येऊन, वेळीच सावध होवुन , आपण या बदलत्या वातावरणाचा स्वीकार करावा. तेथेच नथांबता, मोठ्या हिकमतीने या काळावर स्वार होऊन, यशाची नवी शिखरे गाठणे शक्य आहे. खरंतर ती आजची… काळाची गरज आहे.
त्यासाठी सर्व थरातील पत्रकारांचे शिक्षण-प्रशिक्षण आवश्यक आहे. ते कोणी घरी येऊन देईल याची वाट पाहू नका. छुटपूट अभिमानात आणि फोकनाड राजकारणात गुंतलेल्या पत्रकार संघटनेत वेळ वाया घालवू नका. ज्या तरुणांनी महाविद्यालयीन अभ्यासक्रमातून पत्रकारितेत प्रवेश केला असेल, त्यांनी महाराष्ट्रातील सामाजिक विषयांचा सखोल अभ्यास करावा. राज्यातील विविध भाग फिरून पहावे. प्रत्यक्षात सामाजिक काम करणाऱ्यांना भेटावे…
आणि अफाट कष्ट करणाऱ्या आपल्या पूर्वजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत,भविष्याची आखणी करत…
आपला मार्ग आपणच निवडावा आणि यशस्वी व्हावे !

आज ०६ जानेवारी.. दर्पण दिन
मराठी पत्रकार दिन.
#दर्पणकार #आचार्य_बाळशास्त्री_जांभेकर यांचा स्मरणदिन.
शब्दांना विचारांचं सामर्थ्य देणाऱ्या व कायम मार्गदर्शन करणाऱ्या पत्रकारितेतील सर्व मित्रमंडळींना संत तुकाराम महाराज यांच्या ” “आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने l शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू l”
या अभंग शब्दात #पत्रकार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

महेश म्हात्रे
संपादक – संचालक
महाराष्ट्र रिसर्च सेंटर

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *