मराठी रंगभूमीला मोठा धक्का बसला आहे. सुप्रसिद्ध नाटककार आणि ‘वस्त्रहरण’ या गाजलेल्या नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी सोमवारी (२७ ऑक्टोबर) रात्री १० वाजून ४० मिनिटांनी निधन झाले. मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते. दहिसर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कोकणातून आलेले गवाणकर हे मराठी रंगभूमीवरील एक महत्त्वाचे नाव होते. त्यांच्या लेखनातून ग्रामीण बोली, विशेषतः मालवणी भाषेला नवी ओळख मिळाली. ‘वस्त्रहरण’, ‘दोघी’, ‘वनरूम किचन’, ‘वरपरीक्षा’, ‘वर भेटू नका’ यांसारखी नाटके त्यांच्या लेखणीची ताकद दाखवतात. त्यांचा विनोद, वास्तववादी संवाद आणि साधी, ओघवती भाषा प्रेक्षकांच्या मनाला भिडली. ‘वस्त्रहरण’ या नाटकाने महाराष्ट्रभर लोकप्रियता मिळवली होती आणि प्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांनी या नाटकाची विशेष प्रशंसा केली होती.
गवाणकर यांनी आपली नाट्यकारकीर्द १९७१ साली सुरू केली. एमटीएनएलमध्ये नोकरी करत असतानाही त्यांनी नाट्यलेखनाचा छंद जोपासला. त्यांच्या नाटकांमधून मध्यमवर्गीय जीवन, ग्रामीण संस्कृती आणि मानवी नात्यांतील गुंतागुंत प्रभावीपणे मांडली गेली. मराठी रंगभूमीला नवा आत्मा देणाऱ्या या लेखकाला ९६व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याचा सन्मान मिळाला होता.
त्यांच्या निधनानंतर रंगभूमी आणि साहित्यविश्वातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी ९.३० वाजता बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ठेवण्यात आले असून त्यानंतर त्यांचे पार्थिव दहिसर येथील निवासस्थानी नेण्यात येणार आहे. अंतिम संस्कार अंबावाडी, दौलत नगर स्मशानभूमीत पार पडणार आहेत.
गवाणकर यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीने एक प्रतिभावान, प्रांजळ आणि मातीशी नाळ जोडलेला नाटककार गमावला आहे. त्यांचं योगदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.


Leave a Reply