छत्रपती संभाजीनगर: गुजरातच्या एका व्यापाऱ्याने आपल्या २३ वर्षीय मुलाचे छत्रपती संभाजीनगर येथील १७ वर्षीय मुलीशी लग्न ठरवले होते. या लग्नासाठी त्याने मुलीच्या कुटुंबाला ५ लाख रुपये देण्याची आणि लग्नाचा सर्व खर्च उचलण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, पोलिसांनी आणि बालकल्याण समितीने योग्य वेळी हस्तक्षेप केल्यामुळे हा बालविवाह रोखण्यात यश आले आहे.बरावीमध्ये शिकणारी आकांक्षा (नाव बदलले आहे) ही आंबेडकर नगर येथे आपल्या कुटुंबासोबत राहते. तिचे आई-वडील मोलमजुरी करत असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीने गुजरातच्या एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलाचे स्थळ त्यांच्याकडे आणले होते. मध्यस्थांमार्फत २९ जून रोजी भावसिंगपुरा येथील मोकळ्या मैदानात हा विवाह सोहळा ठरवण्यात आला होता. रविवारी सकाळी वरपक्षाकडील कुटुंब गुजरातहून शहरात दाखल झाले. आकांक्षाच्या कुटुंबानेही काही निवडक नातेवाईकांना आमंत्रण दिले होते.
असा लागला सुगावा
भावसिंगपुऱ्यामधील एका जागरूक महिलेला या विवाहाची माहिती मिळाली. तिने तात्काळ छावणी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विवेक जाधव यांना याबाबत माहिती दिली. सहायक निरीक्षक जाधव यांच्या सूचनेनुसार अंमलदार जालिंदर मांटे, रवींद्र देशमुख, धर्मेंद्र राठोड आणि बालकल्याण समितीचे नितेश धुवे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
वरपक्षाचे पलायन
पोलिस येत असल्याची माहिती मिळताच वरपक्षाने काही क्षणांत मंडप सोडून पलायन केले. मुलीच्या कुटुंबाने नंतर केवळ साखरपुडाच करत असल्याचे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. सूत्रांनुसार, वधूपक्षाला ९ लाख रुपये देऊन लग्न ठरले होते आणि संपूर्ण खर्च वरपक्षच उचलणार होता. दरम्यान, चौकशीसाठी वधूपक्षाला सोमवारी पोलिस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात मोठ्या रॅकेटचा सहभाग असण्याची शक्यता आहे आणि अधिक चौकशीनंतर सत्य समोर येईल.
Leave a Reply