माथेरानमधील पर्यटकांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक होत असल्याच्या विरोधात पर्यटन बचाव संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. दस्तुरी नाक्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असून, यामुळे स्थानिक कष्टकरी, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांवर विपरीत परिणाम होत आहे. या प्रकारावर त्वरित उपाययोजना केल्या नाहीत, तर १८ मार्चपासून माथेरान बेमुदत बंद करण्याचा इशारा समितीने दिला होता. त्यासंदर्भात आज (१७ मार्च) अधीक्षक कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. स्थानिक पातळीवरच या समस्यांचे समाधान करता येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्याने, समितीने १८ मार्चपासून माथेरान बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाला हॉटेल व्यवसायिक, ई-रिक्षा संघटना, व्यापारी संघटना आणि विविध सामाजिक संस्थांचे समर्थन मिळाले आहे. प्रशासनाने लेखी स्वरूपात कायमस्वरूपी मागण्या मान्य केल्याशिवाय माथेरान पुन्हा सुरू होणार नाही, अशी भूमिका समितीने घेतली आहे.
या आंदोलनाचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवरही होणार असून, त्यांच्यासाठीची ई-रिक्षा सेवा देखील बंद राहणार असल्याचे ई-रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल यांनी स्पष्ट केले आहे.
पर्यटनस्थळी फसवणूक थांबवावी – दस्तुरी नाका परिसरात पर्यटकांची दिशाभूल करून जबरदस्ती वेगवेगळ्या पॉईंट्सवर नेले जाते. त्यानंतर उशिरा हॉटेलमध्ये पोहोचवले जाते, यावर त्वरित कारवाई करावी.
गैरसमज पसरवून होणारी फसवणूक रोखावी – पर्यटकांना मिनिट्रेन बंद असल्याची चुकीची माहिती देऊन फक्त स्थानिकांसाठी ई-रिक्षा सेवा उपलब्ध असल्याचे सांगितले जाते, यामुळे त्यांच्याकडून अवाजवी शुल्क आकारले जाते.
दस्तुरी नाका व परिसरातील व्यवस्थापन सुधारावे –
• घोडेवाले, कुली, हॉटेल एजंट आणि रिक्षाचालक यांना ठरावीक मर्यादित भागातच प्रवेश देण्यात यावा.
• ठिकठिकाणी माहितीफलक लावण्यात यावेत.
• सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत.
• प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आंदोलनाचा निर्णय
फेब्रुवारी २७ रोजी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने या मागण्यांसाठी प्रशासनाला लेखी निवेदन दिले होते. अधीक्षक सुरेंद्र ठाकूर, मुख्याधिकारी राहुल इंगळे, वन विभाग आणि पोलिस ठाण्यात देखील निवेदन देऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, दहा दिवस उलटूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि अन्यायकारक प्रथांना आळा घालण्यासाठी माथेरान बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
या बैठकीला पर्यटन बचाव संघर्ष समितीचे प्रमुख कुलदीप जाधव, मनोज खेडकर, शिवाजी शिंदे, प्रवीण सकपाळ, राजेश चौधरी, प्रदीप घावरे, चंद्रकांत जाधव, हॉटेल इंडस्ट्रीचे उमेश दुबल, ई-रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, चर्मकार समाज अध्यक्ष नितेश कदम, महिला आघाडीच्या संगीता जांभळे, सुहासिनी शिंदे, प्रतिभा घावरे, स्वाती कुमार, सुहासिनी दाभेकर, अंकिता तोरणे, श्रुतिका दाभेकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply