माथेरान : माथेरानमधील घोड्यांमध्ये अलीकडेच गूढ आजारामुळे आंधत्वाची प्रकरणे समोर आली असून स्थानिक घोडेपालक, पशुवैद्यक आणि पर्यटन व्यवसायिक यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या दहा पेक्षा जास्त घोडे या आजाराने बाधित झाल्याची नोंद झाली आहे.
घोड्यांमध्ये सुरुवातीला डोळ्यांत पाणी येणे, सूज येणे, रंग बदलणे अशी सौम्य लक्षणे दिसतात. परंतु काही दिवसांतच हा आजार तीव्र होऊन दृष्टी मंदावते आणि अखेरीस आंधत्वात परिवर्तित होतो. काही प्रकरणांमध्ये अँटिप्रोटोझोआ औषधे आणि डोळ्यांचे ड्रॉप्स वापरल्यानंतर थोडी सुधारणा झाली आहे, यावरून संसर्गजन्य प्रोटोजोआ किंवा इतर जीवाणूजन्य कारणांचा संशय व्यक्त होत आहे.
माथेरान हे घोड्यांवर आधारित वाहतुकीसाठी ओळखले जाते. पर्यटकांच्या येण्या-जाण्यासाठी घोड्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे घोड्यांचे आरोग्य थेट स्थानिक अर्थकारणाशी तसेच पर्यटन क्षेत्राशी निगडित आहे. घोड्यांचे आंधत्व केवळ प्राण्यांच्या जीवनावर परिणाम करत नाही, तर पर्यटकांच्या सुरक्षिततेवर आणि स्थानिक रोजगारावरही संकट निर्माण करू शकते.
पशुवैद्यक तज्ज्ञांनी घोड्यांचे डोळे दररोज तपासण्याचे, सुरुवातीला लक्षणे दिसल्यास त्वरित औषधोपचार करण्याचे आणि परिसरातील स्वच्छता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच माशा व कीटकांमुळे संक्रमण पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे.
स्थानिक प्रशासनाने या गूढ आजाराचा मूळ शोध घेण्यासाठी वैज्ञानिक तपासणी तातडीने सुरू करण्याची गरज आहे. अन्यथा माथेरानमधील घोड्यांचा वारसा, पर्यटन आणि स्थानिक उपजीविकेवर मोठे संकट ओढवू शकते.
Leave a Reply