छत्रपती संभाजीनगर: पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली १६ वर्षांची शिक्षा भोगून बाहेर आलेल्या एका ७० वर्षीय वृद्धाला कारागृहातून सुटल्यानंतर निवारा मिळाला नसताना, ‘मातोश्री’ वृद्धाश्रमाने त्यांना आसरा दिला आहे. मराठवाड्यातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना असल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेल्या या वृद्धाने पत्नीच्या हत्येप्रकरणी १६ वर्षांची शिक्षा भोगली. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर कारागृहाचे दरवाजे उघडले, तेव्हा त्यांना घेण्यासाठी बाहेर कुणीही नातेवाईक किंवा ओळखीचे नव्हते. मुलंसुद्धा उपस्थित नव्हती. अशा परिस्थितीत ७० वर्षांच्या या वृद्धाला ‘मातोश्री’ वृद्धाश्रमात पुनर्वसन करण्यात आले.
या घटनेबाबत ‘मातोश्री’ वृद्धाश्रमाच्या प्रतिनिधींनी लोकमतशी बोलताना सांगितले की, त्यांच्या वृद्धाश्रमात एक निवृत्त न्यायाधीशही वास्तव्यास आहेत. कारागृहातून सुटलेल्या या कैद्याला संस्थेने जवळ केले आहे. ते त्यांच्यासाठी कैदी नसून, एक वडीलधारी व्यक्ती म्हणून आश्रमात आले आहेत. जीवंदास (नाव बदलले आहे) असे नाव असलेल्या या ७२ वर्षीय वृद्धाला ‘मातोश्री’मध्ये आल्यावर मोकळ्या हवेत श्वास घेताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. जेव्हा त्यांना सन्मानाने खुर्चीवर बसण्यास सांगितले, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले.
बाहेर पडल्यानंतरचे आव्हान
कारागृह अधीक्षक सचिन साळवे, सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंगारे, दादासाहेब लहान, आणि मातोश्री वृद्धाश्रमाचे सागर पंगारे यांनी या ७० वर्षीय वृद्धाला घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
महाराष्ट्रामध्ये कैद्यांच्या पुनर्वसनासाठी काम करणारी कोणतीही संस्था सध्या अस्तित्वात नाही. त्यामुळे शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर ‘कुठे राहावे’, ‘काय खावे’ असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहतात. यामुळे अनेकदा त्यांना पुन्हा गुन्हेगारीच्या मार्गावर जावे लागते, ज्यामुळे त्यांना शाश्वत आधार मिळत नाही. या पार्श्वभूमीवर ‘मातोश्री’ वृद्धाश्रमाची ही कृती अत्यंत कौतुकास्पद ठरत आहे.
Leave a Reply