अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर आणि आणखी तिघांवर दाखल करण्यात आलेल्या ९० लाख रुपयांच्या खंडणी प्रकरणात मकोका न्यायालयाने त्यांना निर्दोष घोषित केली आहे. ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली होती. विशेष न्यायाधीश बी.डी. शेळके यांनी शुक्रवारी या प्रकरणातील निकालाचा फक्त कार्यकारी भाग जाहीर केला. मात्र, या निर्णयामुळे इक्बाल कासकरची तुरुंगातून तात्काळ सुटका होणार नाही. कारण अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) याच प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली त्याच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे आणि तो अद्याप न्यायालयीन कोठडीत आहे.
या प्रकरणाची सुरुवात बांधकाम व्यावसायिक सुरेश देवीचंद जैन यांच्या तक्रारीवरून झाली होती. जैन हे दर्शन एंटरप्रायझेस व साई उमा कॉर्पोरेशनच्या माध्यमातून बांधकाम व्यवसायात कार्यरत होते. २०१३ मध्ये त्यांनी ठाण्यातील वाघबिल येथे भूखंड मालक भारती भोसले आणि इतरांसोबत विकास प्रकल्पासाठी करार केला होता. कासकरचे वकील तबीश मुमन यांनी सांगितले की, जैन यांनी भोसले यांना भूखंडाच्या मोबदल्यात फ्लॅट देण्याचे मान्य केले होते, परंतु नंतर तो दिला गेला नाही. यामुळे भोसले यांच्या मुलाने मुमताज शेखच्या मदतीने जैन यांच्याशी संपर्क साधून भरपाईची मागणी केली. मे २०१५ मध्ये पुन्हा एकदा संपर्क साधण्यात आला, मात्र जैन यांनी वाटपास नकार दिला.
त्यानंतर शेख आणि इसरार सय्यद यांनी जैन यांच्याशी संपर्क साधून आपण कासकरचे सहकारी असल्याचे सांगितले आणि भूखंडाच्या वाटपाची मागणी केली. त्यानंतर कासकरने फोनद्वारे जैन यांच्याकडे चार फ्लॅट, ३० लाख रुपयांची रक्कम आणि रोख रक्कम अशी एकूण ९० लाख रुपयांची मागणी करत धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला. या धमक्यांमुळे जैन यांनी कवेसर येथील निओपोलिसमधील एक फ्लॅट शेखच्या नावावर आणि दुसरा फ्लॅट भोसले यांच्या नावावर नोंदवला. तसेच, हप्त्यांमध्ये ९० लाख रुपये शेखकडे दिल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
जून २०१७ मध्ये जैन यांनी पुन्हा धमकावल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर ठाणे पोलिसांनी कासकरसह चौघांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. मात्र, आरोपी मुमताज शेख याचा तुरुंगात असतानाच मृत्यू झाला. वकील मुमन यांनी युक्तिवाद केला की, संपूर्ण व्यवहार शेखशी संबंधित होते आणि कासकरशी थेट संबंध नव्हता. “जैन किंवा भोसले यांचा कधीही थेट कासकरशी संपर्क झाला नाही. एक अनोळखी व्यक्ती स्वतःला कासकर असल्याचे सांगत होती. शिवाय, कासकरचा वैयक्तिक फोन क्रमांकही सादर करण्यात आलेला नव्हता,” असे त्यांनी स्पष्ट केले.
२०२२ मध्ये ईडीने कासकर व अन्य तिघांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा स्वतंत्र गुन्हा दाखल केला होता. सध्या कासकरने त्या प्रकरणात विशेष पीएमएलए न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. वकील मुमन यांच्या माहितीनुसार, ठाणे पोलिसांनी २०१७ मध्ये कासकरविरुद्ध आणखी दोन खंडणीप्रकरणी गुन्हे दाखल केले होते. यामध्ये दुसऱ्या बिल्डर राधेश्याम अग्रवाल यांच्याकडून खंडणी मागितल्याचा आरोप होता. मात्र, पुराव्यांचा अभाव आणि साक्षीदारांच्या विरोधाभासी जबाबांमुळे जून २०२४ मध्ये त्या प्रकरणातही ठाणे मकोका न्यायालयाने कासकरला निर्दोष मुक्त केले.


Leave a Reply