नवी दिल्ली : देशात वैद्यकीय शिक्षणाच्या संधींमध्ये मोठी वाढ होणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी तब्बल १०,६५० नवीन एमबीबीएस जागांना मंजुरी दिली आहे. यासोबतच ४६ नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना देखील परवानगी देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिन २०२४ रोजी देशभरात ७५,००० वैद्यकीय जागा निर्माण करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले होते. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या देशात वैद्यकीय शिक्षण संस्थांची संख्या ८१६ वर पोहोचली आहे.
एमएनसीचे अध्यक्ष डॉ. अभिजात शेट यांनी सांगितले की, मिळालेल्या ११० अर्जांपैकी ४७ संस्थांना परवानगी देण्यात आली असून यामुळे देशातील एकूण एमबीबीएस जागांची संख्या १०,६५० होणार आहे. या नव्या जागांसाठी अर्ज प्रक्रिया नोव्हेंबरच्या सुरुवातीला सुरू होणार आहे.
परवानगी देण्याच्या प्रक्रियेत यंदा विशेष गती आणली असून न्यायालयीन अडथळ्याविना निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नव्या महाविद्यालयांना वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
याशिवाय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीही मोठी वाढ होणार आहे. ३,५०० हून अधिक नवीन पीजी जागांसाठी अर्ज आले असून सुमारे ५,००० जागा वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील एकूण पीजी जागांची संख्या ६७,००० पर्यंत पोहोचू शकते.
सरकार वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी संशोधन आणि प्रशिक्षणावर भर देत आहे. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागात वैद्यकीय सेवांचा विस्तार होण्यास मदत होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.


Leave a Reply