मुंबई : मे महिन्यातच पावसाने घातलेल्या धुमकुळाने मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. रविवारी हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड या भागांना येल्लो अलर्ट दिला होता. मात्र सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे हवामान विभागाने आपला अंदाज बदलला आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड येथे हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे वरील भागात पुढील काही तास महत्वाचे ठरणार आहेत. त्यासह सातारा आणि पुण्यातील घाट परिसराला देखील रेड अलर्ट दिला आहे. रेड अलर्ट असलेल्या परिसरात एकाच दिवसात अतिमुसळधार म्हणजे 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
दरम्यान, रविवारी कोकणात दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी सोमवारी मुंबईत प्रवेश केला. मान्सूनने मुंबईत दाखल होण्याचा 55 वर्षाचा विक्रम मोडला आहे. यापूर्वी 1956, 1962 आणि 1971 साली मान्सून 29 मे रोजी मुंबईत दाखल झाला होता. मात्र, यंदा मान्सूनने हा विक्रमही मोडीत काढला आहे. एरवी मान्सून मुंबईत 11 जूनच्या आसपास दाखल होतो. परंतु, यंदा मान्सून 16 दिवस आधीच मुंबईत धडकला आहे. मुंबईसह, पुणे आणि सोलापुरात मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. पुढील 3 दिवसांत महाराष्ट्रातील आणखी काही भाग मान्सून व्यापणार असल्याचे माहिती हवामान विभागानं दिली आहे. मुंबईतील वरळी परिसरातील भुयारी मेट्रोच्या आचार्य अत्रे चौक स्थानकात पाणी, मेट्रो सेवा बंद, भुयारी मेट्रोकडे जाणारं गेटही बंद करण्यात आले आहे. मुंबईतील महत्त्वकांशी प्रकल्प एक्वा लाइन-3 ला पावसाचा फटका बसला आहे. मुंबईतील आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकावर पावसाचे पाणी साचले आहे. मेट्रोमधून उतरताच प्रवाशांना तळ्यात उतरल्याचा भास होताना दिसला. मुंबईतील अंडरग्राउंड मेट्रो-3 ही नुकतीच धावू लागली. मात्र मुंबईतील पहिल्याच पावसात भुयारी मेट्रोला याचा फटका बसला आहे.
Leave a Reply