मायक्रोसॉफ्ट भारतात AI मध्ये करणार इतक्या अब्ज डॉलर्सची गुंतवणूक; सत्या नडेलांची मोठी घोषणा

एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात भारताला पहिल्या प्राधान्याचा देश बनवण्याचा मानस व्यक्त करत मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या दोन वर्षांत मायक्रोसॉफ्ट भारतातील एआयसंदर्भातल्या कौशल्य विकास व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तब्बल ३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. मंगळवारी बंगळुरूमधील मायक्रोसॉफ्ट एआय टूर कार्यक्रमात बोलताना सत्या नडेलांनी ही घोषणा केली आहे.
येत्या दोन वर्षांत ही सर्व गुंतवणूक मायक्रोसॉफ्टकडून केली जाणार आहे. त्याअंतर्गत भारतात नवीन डेटा सेंटर्स उभारण्याचं नियोजन कंपनीने केलं आहे. सध्या भारतात मायक्रोसॉफ्टचे तीन डेटा सेंटर्स असून येत्या दोन वर्षांत म्हणजेच २०२६पर्यंत कंपनीचं चौथं डेटा सेंटरदेखील कार्यरत होण्याची शक्यता आहे. भारतीय तरुणांमधील एआयसंदर्भातल्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मायक्रोसॉफ्टच्या ॲडव्हांटेज इंडिया कार्यक्रमांतर्गत कंपनीकडून पुढच्या पाच वर्षांत किमान १ कोटी भारतीयांना एआयसंदर्भातील प्रशिक्षण देण्याची योजना आहे. मायक्रोसॉफ्टच्या ग्लोबल स्किल्स फॉर सोशल इम्पॅक्ट उपक्रमाचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. भारत सरकार, स्वयंसेवी संस्था व व्यावसायिक संघटनांच्या मदतीने हे प्रशिक्षण मायक्रोसॉफ्टकडून दिलं जाईल.
मायक्रोसॉफ्टनं गेल्या वर्षभरात २४ लाख भारतीयांना या प्रकारचं प्रशिक्षण दिलं आहे. विशेष म्हणजे यात तब्बल ६५ टक्के महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. याशिवाय एकूण प्रशिक्षणार्थींपैकी ७४ टक्के प्रशिक्षणार्थी हे द्वितीय किंवा तृतीय श्रेणीतील शहरांमधील होते, अशी माहिती कंपनीच्या वतीने सत्या नडेला यांनी दिली आहे.
एआय आणि भारतातील प्रगतीविषयी बोलताना सत्या नडेला म्हणाले, “एआय क्षेत्रात भारत वेगाने अग्रस्थानाच्या दिशेनं प्रगती करत आहे. देशभरात यातून नव्या संधी निर्माण होत आहेत. आज आम्ही एआयशी निगडित पायाभूत सुविधा आणि कौशल्य विकासासाठी गुतंवणूक जाहीर करत आहोत. ही गुंतवणूक भारताला एआय क्षेत्रात अग्रस्थानी नेण्याच्या आमच्या बांधिलकीचाच एक भाग आहे. या गुंतवणुकीचा देशभरातल्या तरुणांना आणि संस्थांना व्यापक प्रमाणावर फायदा होईल”, अशी माहिती त्यांनी दिली.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *