धुळे | धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात दुध भेसळीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उकळताच दूध चक्क रबरासारखे घट्ट आणि चिकट झाले, असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासन विभाग (FDA) सतर्क झाला असून संबंधित दूध विक्रेत्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूरमधील एका महिलेने स्थानिक दुकानातून दूध विकत घेतले. काही तासांनंतर दूध खराब झाल्याचा संशय आल्याने तिने ते उकळले असता, ते अक्षरशः रबरासारखे झाले. हा संपूर्ण प्रकार तिने मोबाईलमध्ये टिपला आणि सोशल मीडियावर शेअर केला. काही क्षणांतच व्हिडिओ व्हायरल झाला आणि नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला.
दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात दूध विक्रीत वाढ होते, त्यातच भेसळयुक्त दूध विकले जात असल्याचा प्रकार समोर आल्याने नागरिकांनी अन्न सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “दररोज पिणाऱ्या दुधातच रासायनिक भेसळ असेल, तर नागरिकांच्या आरोग्याचे काय?” असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी किशोर बाविस्कर यांनी सांगितले की, “संबंधित दूध विक्री केंद्रावरून नमुने घेतले जाणार असून, प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातील. दोषी आढळल्यास दुकानदारावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”
या घटनेनंतर जिल्ह्यात विक्री होणाऱ्या दुधाच्या गुणवत्तेबद्दल गंभीर शंका उपस्थित झाल्या आहेत. नागरिकांनी प्रशासनाला आवाहन केले आहे की, सणासुदीच्या काळात नियमित तपासण्या घेऊन भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा अशा घटना वाढतच जातील.


Leave a Reply