शिंदेंसेनेचे आमदार बिबट्याच्या वेषात विधानभवनात; ही केली मागणी

जुन्नर तालुक्यात गेल्या तीन महिन्यांत तब्बल ५५ नागरिकांचे मृत्यू बिबट्यांच्या हल्ल्यांत झाल्याचे गंभीर चित्र समोर येत असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारवर तातडीने ठोस उपाययोजना करण्याचा दबाव वाढत आहे. याच संदर्भात विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना (शिंदे गट) चे जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांनी बिबट्याचा वेष परिधान करून या संकटाकडे सरकारचे लक्ष वेधले.

अधिवेशनानंतर पत्रकारांशी बोलताना सोनावणे म्हणाले की, ग्रामीण भागातील परिस्थिती भीषण झाली आहे. मुले अंगणात खेळत नाहीत, शाळेत जात नाहीत, शेतकरी धास्तावले आहेत. “सरकार म्हणते शेतकऱ्यांनी मानेला तारेचा पट्टा बांधून शेती करावी; पण हे उपाय व्यवहार्य नाहीत,” अशी टीका त्यांनी केली.

बिबटे आता जंगलात न राहता उसाच्या फडात व मानवी वस्त्यांच्या जवळ वावरत असल्याने हल्ल्यांची मालिका वाढत आहे. “मुंबईत फ्लॅटमध्ये राहणाऱ्या अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील भीतीची जाणीव नाही,” असे म्हणत त्यांनी प्रशासनावरही टीका केली.

सोनावणे यांनी राज्य सरकारसमोर तातडीची मागणी केली की, तीन महिन्यांच्या आत किमान २,००० बिबट्यांना सामावून घेणाऱ्या दोन मोठ्या रेस्क्यू सेंटर्स उभारावीत—एक जुन्नर तालुक्यात आणि एक अहिल्यानगर येथे. नर आणि मादी बिबट्यांसाठी स्वतंत्र पिंजरे, नसबंदी व्यवस्था, तसेच प्राण्यांसाठी विशेष रुग्णालय उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरण व वाइल्डलाइफ विभाग या प्रकल्पाचा खर्च उचलण्यास तयार असल्याचेही त्यांनी नमूद केले. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती जाहीर करावी आणि मुख्यमंत्र्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून धोरणात्मक निर्णय घ्यावेत, अशी ठाम मागणी सोनावणे यांनी अधिवेशनात केली आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *