विधानसभेत आमदाराची पान मसाल्याची पिचकारी; अध्यक्ष संतप्त, दिला कडक इशारा

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर दंडात्मक कारवाई केली जाते, मात्र विधानसभेतच एका आमदाराने पान मसाला खाऊन पिचकारी मारल्याची गंभीर घटना घडली आहे. उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांनी हा प्रकार अत्यंत गंभीर घेत सर्व आमदारांना इशारा दिला.
विधानसभा अध्यक्षांनी सभागृहात जाहीरपणे सांगितले की, एका आमदाराने सभागृहात पान मसाल्याची पिचकारी मारली असून, ती त्यांनी स्वतः स्वच्छ करून घेतली. “मी हा व्हिडिओ पाहिला आहे, मात्र कोणालाही सार्वजनिकरित्या अपमानित करण्याचा माझा हेतू नाही, म्हणून मी त्या आमदाराचे नाव घेत नाही, असे ते म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, पण सर्व सदस्यांनी लक्षात ठेवावे, अशा कृती पुढे सहन केल्या जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाना पुढे म्हणाले, “विधानसभा केवळ अध्यक्षांची नाही, ती ४०३ सदस्यांची आहे. तिची स्वच्छता राखणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. संबंधित आमदाराने स्वतः पुढे येऊन कबुली द्यावी, अन्यथा मी त्यांना बोलावून घेईन.”

उत्तर प्रदेश विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, सोमवारी सभागृहात प्रचंड गदारोळ झाला होता. समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी विद्यापीठ कार्यपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात आक्षेप नोंदवत सभागृहातून वॉकआउट केले होते.
महाना यांनी सर्व सदस्यांना विनंती केली की, “विधानसभा ही राज्यातील २५ कोटी नागरिकांच्या सन्मानाचे प्रतीक आहे. त्यामुळे तिची प्रतिष्ठा आणि स्वच्छता कायम राखण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, असे ते म्हणाले.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *