मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी गंगा नदीच्या स्वच्छतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत देशातील कोणतीही नदी स्वच्छ नसल्याचा आरोप केला आहे. मनसेच्या १९व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमादरम्यान मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी महाकुंभातून आणलेले गंगाजल राज ठाकरे यांना पिण्यास दिले, मात्र त्यांनी ते नकारले. यावर भाष्य करताना ते म्हणाले,
“बाळा नांदगावकर यांनी मला गंगाजल प्यायला आणले होते, पण मी नकार दिला. मी म्हणालो, मी आंघोळही करणार नाही, मग गंगाजल का प्यावे? ते पाणी कोण पिणार? आता कोविड संपला, दोन वर्षे लोक मास्क लावून फिरत होते, मग मी गंगेत उडी मारावी का? भक्तीला तर्काची जोड असली पाहिजे.”असं राज ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले मी राजीव गांधी पंतप्रधान होते तेंव्हापासून ऐकत होतो की ‘गंगा लवकरच स्वच्छ होईल’. पण आजही स्थिती तशीच आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहिले आहेत, जिथे लोक गंगेत शरीर धुत आणि खाजवत असल्याचे दिसते. हा केवळ प्रचार झाला आहे, प्रत्यक्षात कोणतीही सुधारणा झालेली नाही.”त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की देशातील कोणतीही नदी स्वच्छ नाही आणि आता नागरिकांनी या भ्रमातून बाहेर पडण्याची गरज आहे.
राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून काहींनी त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचे समर्थन केले, तर काहींनी त्यांच्यावर टीका केली. गंगेची स्वच्छता आणि देशभरातील नद्यांचे प्रदूषण हा गंभीर प्रश्न असून, त्यावर ठोस उपाययोजना होणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.


Leave a Reply