मुंबई : ‘‘भारतीय जनता पक्ष हा केवळ कार्यकर्त्यांचा पक्ष नाही, तर कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करणारा पक्ष आहे. आज नरेंद्र मोदी हे नावच जगातील सर्वांत मोठा ब्रँड बनले आहे,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाची ताकद अधोरेखित केली. मुंबई भाजपच्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, महापालिकेत भ्रष्टाचारविरहित व पारदर्शक प्रशासन देणे, सामान्य व्यक्तीला महापौर बनवणे आणि झोपडपट्ट्यांतील दहा लाख लोकांना घरे उपलब्ध करून देणे हे भाजपाचे प्रमुख उद्दिष्ट असेल.
त्यांनी विरोधकांवरही टीका केली. ‘‘शिवसेनेने २५ वर्षे महापालिकेवर सत्ता गाजवली, पण मुंबईतील विकास कोठेच दिसला नाही. भाजप सत्तेवर आल्यास २०० पटीने जास्त विकासकामे होतील,’’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोशल मीडियावरील प्रचाराबाबत बोलताना आशिष शेलार म्हणाले की, ‘‘भाजपची खरी ताकद ट्रोलर्समध्ये नाही, तर वॉर्डपातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांत आहे. याच कार्यकर्त्यांच्या बळावर भाजप महापालिकेची सत्ता मिळवणार आहे.’’ फडणवीस यांनी स्पष्ट केले की, ‘‘जागतिक दर्जाच्या पारदर्शक कारभारामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही भाजपाच्या उपक्रमांना मान्यता मिळत आहे.’’
Leave a Reply