चिपळूण तालुक्यातील मोरवणे ग्रामसभेत गावकऱ्यांनी एक ऐतिहासिक ठराव एकमुखाने मंजूर केला. या ठरावानुसार गावातील जमीन गावाबाहेरील किंवा परजिल्ह्यातील लोकांना विकता येणार नाही. एखाद्या कुटुंबाला आर्थिक गरजेपोटी जमीन विकावी लागल्यास ती प्रथम गावातील व्यक्तींनाच विकावी, अशी अट ठेवण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांत कोकणातील निसर्गरम्य गावांमध्ये बाहेरील लोकांनी मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केल्या. परवडणाऱ्या किमती आणि उत्तम हवामानामुळे या व्यवहारांना गती मिळाली होती. मात्र, यामुळे स्थानिक तरुणांना घरासाठी किंवा शेतीसाठी जागा मिळणे कठीण होऊ लागले. सामाजिक समतोल बिघडू लागल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता वाढली होती.
मोरवणे ग्रामसभेत मांडण्यात आलेल्या चर्चेत गावकऱ्यांनी स्पष्ट केले की, बाहेरचे लोक जमिनी खरेदी केल्यानंतर संरक्षक भिंती बांधतात, पारंपरिक पाऊलवाटा बंद होतात, रस्त्यांच्या समस्या वाढतात आणि वारंवार वाद निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर गावाच्या भविष्यातील पिढ्यांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी गावकऱ्यांनी हा ठराव मंजूर केला.
या ठरावाची प्रत दुय्यम सहायक निबंधक अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आली असून गावातील सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीसाठी फलकही लावण्यात आले आहेत. सरपंच सचिंता जाधव यांनी सांगितले की, “गावकऱ्यांच्या पुढाकारामुळे हा ठराव शक्य झाला असून त्यामुळे गावाची जमीन गावातच राहील.” मोरवणे ग्रामसभेचा हा निर्णय स्थानिकांच्या स्वाभिमानाचा आणि एकात्मतेचा पुरावा ठरत असून इतर गावांसाठीही तो एक आदर्श ठरू शकतो.
Leave a Reply