“पिठोरीचा सण’ म्हणजे मातृत्वाचा आनंद सोहळा ! एक आई आपल्या बाळाच्या जन्मासाठी, त्याच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी या दिवशी प्रार्थना करते; म्हणूनच आजचा हा दिवस आपल्या महाराष्ट्रात तरी *”मराठी मातृ दिन” म्हणुन साजरा केला जातो…. आईच्या अनंत उपकारांचे मनःपूर्वक स्मरण करण्याचा हा सोनेरी दिवस… म्हणून माझ्या आईविपयीचा, सौ. रजनी बळीराम म्हात्रे, हिच्या संदर्भातील एका आगामी पुस्तकात समाविष्ट असणारा हा लेख…#आईची_जीवनविद्या ….. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. सगळं वाडा गाव भिजल्या पाखराप्रमाणे गपगार झोपलं होतं. अगदी ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटही पाऊसधारांमध्ये विरघळत होता. दररोजच्या सवयीनुसार मी बाबांचे अंग दाबून देत होतो. शेतावरच्या दगदगीने थकलेले त्यांचे शरीर एखाद्या श्रमशिल्पासारखे पडलेले. वेदनेला साद देत. त्यात भर होती माझ्या मुंबईला जाण्याच्या हट्टाची. खरं तर, पत्रकारिता वगैरे काय असते, हे घरा-परिसरात कोणालाच ठाऊक नसण्याचा तो काळ. 27 वर्षांपूर्वी मला ‘मुंबई – सकाळ’ मध्ये ‘प्रशिक्षणार्थी पत्रकार’ म्हणून रुजू होण्याची संधी चालत आलेली. पगार / मानधन इतकं कमी की घरी सांगणे शक्य नव्हते. एकीकडे सरकारी नोकरीची आशादायक शक्यता आणि दुसरीकडे आवडीच्या क्षेत्रात घुसण्याची संधी. यामुळे खरं तर मन सैरभैर झालेलं. फक्त मनात इच्छा होती पत्रकार होण्याची. आपल्या लोकांसाठी काही तरी करण्याची. समोर प्रश्न होता, पत्रकारितेचा श्रीगणेशा कसा करावा? वडिलांच्या व्यवहारी दृष्टी समोर हा विचार बोलायला सुद्धा भिती वाटत होती. दुसरीकडे आईला काही सांगावं तर तिला वर्तमानपत्राची ओळख आठवड्याच्या राशिभविष्यापुरतीच होती. पण मला तिच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेचा अंदाज होता. आवडीचे काम आपल्या मुलाचे ‘भविष्य उज्ज्वल करू शकेल’, हा आत्मविश्वास तिला पारंपरिक जीवनविद्येने बहाल केला होता. त्यामुळे माझ्या मनाची तगमग तिला समजत होती. जून 1991 मध्ये ‘सकाळ’कडून आलेलं पत्र तिला दाखवल्यावर आनंदाच्या भरात तिने, वडिलांची परवानगी मिळवून द्यायचे मनावर घेतले. त्या रात्री काय झाले होतं आठवत नाही, बाबा थोडे रागातच होते. अबोला असला की ते माझ्याकडे पाठ फिरवून पडत. मी मात्र हलक्या हाताने त्यांचे तळपाय चोळत होतो. पाच-सात मिनिटात त्यांचे शरीर सैल पडू लागले. त्यांना झोप लागणार, तेवढ्यात आई म्हणली, ‘अहो, ऐकता ना, मयू मुंबईला जायचा हेका सोडायला तयार नाही. पत्रकारच होणार म्हणतोय. जातोय तर जाऊ द्या ना, तुम्ही पण किती ताणून धरता? कळेल त्याला बाहेरचं जग काय असतं आणि घराची सावली काय असते ती. आणि समजा काय जमलंच नाही तर येईल परत वाड्याला. करील काय तरी कामधंदा. शेतीभाती आहे आपली ’ आईच्या या बोलण्यावर बाबांनी फक्त हुंकार भरला. तो होकार कानांनी ऐकताच चेहरा फुलून गेला, माझा आणि आईचाही. कारण माझ्या आतूर इच्छेशी तिचे अजोड नाते जुळलेले होते. अगदी जन्मापासून… खरं तर जन्माआधीपासून तिच्या पोटात असताना एका नाळेने आम्ही दोघे जोडलेले होतो. जन्मल्यावर मला तिने आपल्या पदराखाली घेतले आणि आपल्याशी जोडून ठेवले. अगदी सुरक्षित आणि उबदार मायेच्या पंखाखाली.
तसं पहायला गेलं तर 1 जुलै 1991 ला मुंबई ‘सकाळ’च्या प्रभादेवी येथील कार्यालयात रुजू होण्यापूर्वी मी दोन वर्षे ठाण्यात राहून पाहिले होते. तिथे इंग्रजीच्या अज्ञानाने कायद्याचे शिक्षण घेऊ दिले नाही आणि विद्यापीठ निवडणुकीत केलेले ‘पराक्रम’ घरापर्यंत पोहोचल्याने बाबांनी घरी बोलावून घेतले होते. पण त्या काळात आप्त-इष्टांच्या सान्निध्यात असल्याने आई-बाबा बऱयापैकी निश्चिंत होते. पण आता मुंबईतील अनुभव वेगळे असणार होते…
गाव सोडण्याची ‘ती’ रात्र आईने जागूनच काढली. मला लाडवाचा डबा दिला. चिवड्याची पिशवी भरली. मोजकं, कमी बोलण्यासाठी प्रसिद्ध असणारी माझी आई त्या दिवशी खूप बोलत राहिली. शहरातीलं लोक, रस्ते… किती तरी विषय. मध्येच थांबली आणि म्हणाली, ‘तू मला एक वचन दे, तू स्कूटर खूप जोरात चालवतोस, तिकडे मुंबईत स्कूटर घेऊ नको. घेशील तर कारच घे.’ मी हसून होकार दिला. तरी तिच्या चेहऱयावरचे प्रश्नचिन्ह कायम. मी विचारले, ‘अजून काय?’ त्यावर ‘काही नाही, तू कधी लोकल ट्रेनमध्ये दारांत उभा राहू नकोस, तुला माहीत आहे ना, तो पातकरांचा सतिश तसाच गेला. लेकाच्या आठवणीने त्याची आई अजून रडत असते.’ आईचे ते शब्द आजही माझ्या कानात घुमत असतात. बातमीदारी करताना लोकलने खूप फिरलो; पण दरवाजात कधी उभा राहिलो नाही. राहणारही नाही. माझ्या जोडीच्या बहुतेक रिपोर्टर्सकडे दुचाकी होत्या. मी मात्र कधी त्या फंदातच पडलो नाही… कुणी मित्र जोरात मोटरसायकल चालवत असेल तर झर्रकन आईचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत असे.
मुंबईतील पहिली पाच-सहा वर्षे म्हणजे अनुकूल-प्रतिकूल अनुभवांची ‘जुगलबंदी’, कधी रडवणारी, दमवणारी तर; कधी हसवणारी सुखद. त्या काळात भुकेचा, टीकेचा, पराकोटीच्या भीतीचा अनेकदा सामना केला. पण तोंडातून कधी एक वाक्य बाहेर पडले नाही. आई नेहमी सांगायची. ‘दुःख देवाला सांगावे, सुख देवाला मागावे’, अर्थात आम्हाला हे सांगताना आईचे वागणे अगदी तिच्या बोलण्याप्रमाणे असे. अगदी आजही गीतेत सांगितलेल्या स्थितप्रज्ञ योग्याप्रमाणे सुख-दुःखात ती अगदी खंबीर असते, स्थिर असते. एकदा बाबांवर प्राणघातक हल्ला झाला होता. भांडण अगदी साधे होते, त्याला धार्मिक संघर्षाचा मुलामा देण्यात आला. वाडा-भिवंडी रस्त्यावरल्या हिंसक टोळक्याने बाबांना त्यांच्या नकळत घेरलं आणि हल्ला केला. आमच्या असंख्य हितचिंतकांनी पोलीस प्रशासन हलवून सोडलं, विशेषतः सगळे पत्रकार मित्र आमच्या पाठीशी ऊभे राहिले. जखमी बाबांना एका गाडीतून ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलला नेलं. मी धावत-पळत तिकडे पोहोचलो. आयसीयूच्या बाहेर आई जपमाळ हातात घेऊन बसलेली, चेहऱयावर तिच नेहमी दिसणारी स्निग्ध शांती. माझ्या चेहऱयावर चिंता, क्रोध, वैफल्य अशा नानाविध छटा. त्या सर्व भावना एका क्षणात ओळखून आई म्हणाली, ‘ये. त्यांना काही होणार नाही. माझा कृष्ण आहे ना आपल्या पाठीशी.’ आईचे बोल ऐकून माझा चेहऱयावर आपण काही तरी ‘अनाकलनीय ऐकत’ आहोत असे भाव आले असावेत, त्याकडे दुर्लक्ष करीत आई म्हणाली, आत जा. डॉक्टर आले आहेत. मी आत गेलो. माझे मोठे भाऊ डॉ. सुधीर आपल्या दुसऱया डॉक्टर मित्रांशी गंभीरपणे बाबांना झालेल्या जखमांबद्दल बोलत होते. वातावरणात एकदम तणाव होता. मला पाहून भाऊ असहाय्यपणे हसला आणि पुन्हा मित्रांशी बोलू लागला. तिथे उभे राहणे असह्य झाल्याने मी परत आईजवळ जाऊन बसलो. तिच्या हाताच्या स्पर्शाने तिच्या अंतरातील शांती माझ्या तन-मनाला शांत करून गेली. चार-सहा तास तसेच गेले आणि सुधीरभाऊ हसऱया चेहऱयाने धावत आला. बाबांच्या तब्येतीला कसलाच धोका नसल्याचे त्याने सांगितले. आईचे हात आणि डोळे आपोआप मिटले गेले. हळुवार शब्द कानी पडले, ‘बघ मयू, म्हणाले होते ना, त्यांना काही होणार नाही. चांगले कर्म करणाऱयाला देव फुलासारखं सांभाळतो.’ तिचे सश्रद्ध मन सद्गदित स्वरात व्यक्त होत होतं. आजही ते तसंच आहे. मध्यंतरी बाबांच्या आजारपणात जेव्हा-जेव्हा तिला रुग्णालयात बसलेली पाहिलीय, तिच्या चेहऱयावरचा शांत भाव कधी ढळला नाही. त्यामुळेच असेल कदाचित; आई रुग्णालयाच्या प्रतीक्षालयात बसलेली असो वा एखाद्या लग्नाच्या स्वागत समारंभात तिचा शांत, स्निग्ध चेहरा आसपासच्या लोकांना चुंबकाप्रमाणे आकर्षित करत असतो. जुन्या सिनेमात असायची ना तशी माझी आई अगदी टिपीकिल मराठमोळी माय आहे. तिच्या अंतरंगात वासरावर वात्सल्याचा वर्षाव करणारी गाय आहे, तशीच विपरीत परिस्थितीमध्ये कधीही न डगमगणारी एक वाघीणही दडलेली असते. हे मी एकदा नव्हे; अनेकदा अनुभवले आहे.
हल्लीच्या मुली ज्या वयात दहावीला असतात, त्या वयात आईचे लग्न झाले. सहा लोकांच्या कुटुंबातून आई थेट वीसेक लोकांच्या कुटुंबात आली. पहिल्याच दिवशी मोठ्या जाऊबाईंनी पन्नास-साठ भाकऱयांचे पीठ समोर ठेवले. शांत-संयमी आईने मोठ्या कौशल्याने त्या पिठाच्या डोंगराला भाकऱयांच्या चवडीमध्ये रूपांतरित केले. पण ते करताना तिच्या हळदभरल्या गौर अंगावर चुलीतील उग्र ज्वाळांची लालभडक नक्षी पडलेली फक्त माझ्या आजीला दिसली आणि एका नवथर तरुणीला लग्नाच्या पहिल्या दिवशी झालेला त्रास पाहून तिचे मातृहृदय कळवळले. ‘ नव्या सुनेला कुणी भाकऱया करायला लावल्या?’ हा आजीचा खडा सवाल स्वयंपाकघरात शांतता पसरवून गेला. आजीचे सहानुभूतीचे बोल ऐकून बिचाऱया आईचा जीव सुखावून गेला आणि तिथूनच सुरू झाला सासू-सुनेच्या अकृत्रिम प्रेमाचा अद्वित्तीय प्रेमबंध. तो काळ फार श्रीमंतीचा नव्हता, अर्थात मी आर्थिक श्रीमंतीबद्दल बोलतोय, मनाची श्रीमंती एवढी होती की, आपल्या भावाची लेकरं पोरकी झाली तर आजी-आजोबांनी स्वतःच्या पोरंबाळांप्रमाणे त्यांचेही सर्वार्थाने संगोपन केले. लग्न लावली, आपापल्या पायावर उभे केले. अगदी कोणताही आव न आणता. त्यामुळे पैशावाचून फार काही अडत नसण्याचा तो काळ होता. सुनांना वर्षाला चार-दोन लुगडीच मिळायची. मध्येच एखादं लग्नं आलं तर नवंकोरं लुगडं मिळायचं. बाकी सगळं जेमतेमच. माझी आई मात्र, आपल्या साडीची घडी सासूबाईंनी मोडावी असा आग्रह धरायची. मग कधी आजी मोठ्या कौतुकाने तिच्या साडीची घडी आईने मोडावी असा आग्रह धरे. या आणि अशा अनेक प्रसंगातून आईचा निगर्वी आणि निस्वार्थी स्वभाव दिसतो आणि मनाला भावतो.
भरपूर कष्ट करावेत आणि जे लाभलंय त्यात समाधान मानावे हा आईचा मूलमंत्र ‘. समाजातील दुःखी कष्टी गरिब लोकांसाठी काम करताना व्यक्तिगत सुखाकडे पाठ फिरवा. मग पाहा सगळ्या चांगल्या गोष्टी तुमच्या मागे-मागे येतील’, असे आई वारंवार सांगायची. आता वयानुसार तिची या तत्त्वज्ञानावरची श्रद्धा वाढलीय. संतांचे अभंग प्रमाण म्हणून देताना तिचे सश्रद्ध मन विश्वासाने भरलेले आणि भक्तीने भारलेले असते. 2005 सालचा एक प्रसंग आठवतो. अगदी ऐन पस्तिशीत संपादक म्हणून मी नागपूरला काम करीत होतो. दैनिक ‘सकाळ’ मधून ‘लोकमत’मध्ये जाण्याची संधी समोरून चालत आली होती. पण ‘सकाळ’चा राजीनामा आणि ‘लोकमत’मध्ये रुजू होण्याची तारीख, यामध्ये बराच वेळ चालला होता. साहिजकच तणावपूर्ण मनाने आईशी नीट बोलणे होत नव्हते. एक-दोन दिवसात आईला माझी मनस्थिती लक्षात आली आणि कधी नव्हे त्या आग्रहाने म्हणाली, एक-दोन दिवसांसाठी घरी येऊन जा. घरी गेल्यावर पाहतो तर मला आवडणारे सगळे पदार्थ तयार होते. वर्षा वहिनीने केलेला साग्रसंगीत स्वयंपाक सगळ्या व्यथा विवंचनांना विसरायला लावणारा होता. दुपारी सगळे वामकुक्षी करीत पहुडले होते. मी नेहमीप्रमाणे आईजवळ गेलो. मला काही बोलण्याची संधी न देता आई म्हणाली, ‘सध्या खूप ताण-तणाव आहे का?’ फोनवर बोलताना तू पूर्वीप्रमाणे हसून बोलत नाहीस. काय झालंय तरी काय? नोकरीचा काही प्रश्न आहे का?’ तिच्या या थेट बोलण्याने मला लपवा-छपवी करण्याची संधीच मिलाली नाही. मी हो म्हणालो. पहिल्या नोकरीचा राजीनामा दिलाय. आता नव्या ठिकाणचे पत्र जोवर हातात मिळत नाही, तोवर मनाचा ताण कसा हलका होईल?
माझ्या या प्रश्नावर आईने स्मित केले.चिमण्यांनी भरलेल्या चौकाकडे हात करून म्हणाली, त्या बघ, चिमण्या कशा चिवचिव करताहेत, मस्त नाचताहेत. माझ्या करियरच्या एवढ्या मोठ्या प्रश्नाशी त्या चिमण्यांचा संबंध काय, हा शहाणा विचार मनात उगवत असतानाच, तलवारीच्या धारेसारखे तिचे शब्द तळपले. चिमण्यांचे बँकेत खाते असते का? त्यांच्या घरट्यात दाणापाणी भरलेले असते का? बघ ना… आत्ता चिवचिव करीत नाचणाऱया चिमण्यांना रात्रीच्या खाण्याची चिंता आहे का? आईच्या या अनुभवी बोलांनी माझ्यासमोरील भविष्याची काल्पनिक चिंता कागदाच्या राशीसारखी क्षणार्धात जळून गेली. आई बोलत होती, ‘अरे आपल्या कामावर आणि देवावर विश्वास ठेवावा. मग जीवनात कशाचीच काळजी करायला नको. तुम्ही शिकलेले लोक संतांचे अभंग वाचत नाहीत. बाकी कथा-कांदबऱया वाचता. आपले ज्ञानोबा-तुकाराम म्हणजे नुसते नमस्कार करण्यापुरते संत नाहीत. ग्यानबातुकाराम हा आपल्या जगण्याचा पाया आहे. त्यांचे अभंग – हरीपाठ आजही आपल्याला जगण्याचे बळ देतात. संत सांगतात, ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ आणि आपण लोक मन दुःखी करून चिंतेच्या चितेत जाऊन पडतो. तुला तो एकनाथ महाराजांचा अभंग ठाऊक आहे ना’, असे म्हणून आई तिच्या आवडत्या ओळी गुणगुणायला लागली. ‘आवडीने भावे, हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी, सर्व आहे… सकलजीवांचा करितो सांभाळ, तुज मोकलील ऐसे नाही…’ अभंगाची एकेक ओळ माझ्या दुभंगलेल्या आत्मविश्वासाला बळकटी देत गेली आणि तेव्हापासून आजतागायत तणावाचे तण माझ्या मनात, जीवनात उगवणे थांबले. परिणामी जगणं सर्वांगाने सफळ, सुफळ होत गेलं. संपादकीय जबाबदारी असो वा देश-विदेशातील दौरे, प्रगतीचा प्रत्येक टप्पा फक्त माझाच नाही तर माझी सुविद्य पत्नी सुमेधा आणि अथर्व यांच्या यशस्वी वाटचालीकडे आई- बाबा दोघेही मोठ्या मायेने लक्ष ठेवून असतात. मुलाबाळांचे यश- समाधान वडीलधारी मंडळींचे आयुष्य वाढवतात असं त्यांचे म्हणणे असतं. त्यांच्या या उपयुक्त जीवनविद्येला मी अनेकदा आधुनिक विचारसरणी सोबत घासून पाहतो. जेव्हा जेव्हा माझ्या या चिकित्सक स्वभावाला ऊत्तर मिळत नाही तेव्हा किंवा अवचित आईच्या आठवणींचा आवेग उसळतो तेव्हा मी थेट आईकडे धाव घेतो. तिच्या आणि बाबांच्या मायेच्या स्पर्शात सगळा संभ्रम विरघळवून टाकण्याचे सामर्थ्य आहे. तर असं हे आरशा प्रमाणे प्रतिबिंबित करणं आणि तेवढ्याच प्रमाणात प्रतिबिंबित होणं मला सातत्याने जगणं किती सर्वांसुंदर याचा प्रत्यय देत असतं. मध्यंतरी एका अमेरिकन शास्त्रज्ञाचा शोधनिबंध वाचायला मिळाला होता, त्याचा निष्कर्ष मन सुखावून गेला, तो म्हणतो, “ममाज् बाॅय” किंवा आईच्या खूप जवळ असणारी मुलं- मुली अन्य मुलांच्या तुलनेत जास्त यशस्वी होतात कारण ती नेहमीच आईच्या कुशीत सुखरूप असतात. त्यामुळे त्यांचा धाडसी स्वभाव त्यांना यशस्वी बनवतो.” आपल्या लेकराच्या सुखाची लकेर मायेने रेखणारी ही मातृत्वाची अनोखी परीभाषा आधुनिक युगातील सगळ्या मुला- मुलींना कळो. आईची ही माया आणि वडिलांची छत्रछाया सगळ्यांना मिळो आणि सगळ्यांचे भले होवो, एवढेच मागणे !
Leave a Reply