मुंबई: मुंबईतील वाढत्या शहरी वाहतुकीला अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर बनवण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंडळाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुंबई लोकल आणि मुंबई मेट्रो यांच्या एकत्रीकरणासह पायाभूत सुविधांच्या योग्य वापरासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे मंडळाच्या ‘कार्यक्षमता आणि संशोधन विभागा’चे कार्यकारी संचालक संजीव कुमार यांनी मुंबई रेल्वे विकास महामंडळाला (MRVC) या संदर्भात सूचना दिल्या आहेत.
या सूचनांमध्ये मुंबई लोकल आणि मेट्रोचे एकत्रीकरण करणे, तसेच शक्य असलेल्या ठिकाणी पादचारी पूल किंवा रेल्वे स्थानके उभारून त्यांना मेट्रोला जोडणी देण्याचा समावेश आहे. भविष्यात मुंबईत ३५० किलोमीटरपर्यंत मेट्रोचे जाळे विस्तारणार असल्याने, प्रवासी वाहतूक अधिक सुलभ व्हावी आणि प्रवाशांना रेल्वे व मेट्रोचा एकत्रित लाभ घेता यावा हा यामागे मुख्य उद्देश आहे.
अध्यक्ष आणि सदस्य
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) मुंबई मेट्रोची बहुतांश कामे सुरू असल्याने, या समितीचे अध्यक्षपद एमएमआरडीएला सोपवण्यात आले आहे. समितीमध्ये मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, मुंबई रेल्वे विकास महामंडळ (MRVC), मेट्रो, सिडको, बेस्ट आणि नगर विकास विभाग यांच्या प्रत्येकी एका प्रतिनिधीचा समावेश आहे.
प्रमुख शिफारसी
ही समिती रेल्वे आणि मेट्रो स्थानकांना जोडण्यासाठी पादचारी पूल उभारणे, भुयारी मार्ग (सबवे) किंवा इतर पर्यायांबाबत शिफारसी करेल. या समितीमध्ये प्रमुख प्राधिकरणांचे प्रतिनिधी असल्याने, त्यांच्या शिफारसींची अंमलबजावणी वेगाने आणि प्रभावीपणे होईल, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय मंडळाच्या सूचनेनुसार संबंधित प्राधिकरणांनी यापूर्वीच आपले प्रतिनिधी नियुक्त केले असून, लवकरच या समितीची एकत्रित बैठक होणार आहे. मुंबईकरांसाठी ही एक महत्त्वपूर्ण घडामोड असून, यामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल अपेक्षित आहेत.
Leave a Reply