पुणे : देशात भाजप सरकार सत्तेत आल्यापासून नामांतराची मोहीम वेगाने सुरू आहे. अनेक शहरे आणि जिल्ह्यांतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात आली आहेत. उत्तर प्रदेशातील अलाहाबादचे नाव प्रयागराज करण्यात आले, तर महाराष्ट्रातही औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर झाले आहे. अलीकडेच, अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्यात आले आहे. जनभावनांचा आदर करून ही नामांतरे करण्यात आल्याचे सत्ताधारी पक्षाकडून सांगण्यात येत आहे. आता या मालिकेत पुणे रेल्वे स्थानकाच्या (Pune Railway Station) नामांतराची मागणी जोर धरू लागली आहे. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे जंक्शन रेल्वे स्थानकाला ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे’ असे नाव देण्याची मागणी केली आहे. पुणे शहराला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला असल्याने या मागणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मुंबईतील ७ रेल्वे स्थानकांच्या नामांतराला मंजुरीनंतर पुण्याकडे लक्ष
गेल्या वर्षी राज्य सरकारने मुंबई शहरातील ७ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याच्या प्रस्तावाला विधान परिषदेत मंजुरी दिली होती. यात मध्य रेल्वेवरील दोन, पश्चिम रेल्वेवरील दोन आणि हार्बर रेल्वे मार्गावरील तीन स्थानकांचा समावेश होता. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नामांतराला मंजुरी मिळाल्यानंतर, हा प्रस्ताव विधान परिषदेतही मंजूर झाला. मुंबईतील या नामांतरानंतर आता पुणे शहरातील प्रमुख रेल्वे स्थानकाच्या नामांतराची मागणी पुढे आली आहे.
थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव का?
खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे शहराच्या ऐतिहासिक वारशावर भर दिला. मराठा साम्राज्यात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते आणि त्यांच्या कार्याचा प्रभाव पुणे शहरावरही होता. त्यामुळे त्यांच्या नावाने रेल्वे स्थानकाचे नामांतर करणे हे शहर आणि त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासारखे असेल, असे कुलकर्णी यांचे म्हणणे आहे.
नामांतरासोबतच, मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरण, स्वच्छता आणि इतर सोयी-सुविधांमध्ये सुधारणा करण्याची मागणीही केली आहे. यामुळे प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळतील आणि स्थानकाला एक नवा चेहरा मिळेल. आता या मागणीवर राज्य सरकार काय भूमिका घेते आणि पुणे रेल्वे स्थानकाला ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे’ हे नाव मिळते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


Leave a Reply