मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला वाहतुकीच्या सोयीसाठी लवकरच मोठी भेट मिळणार आहे. ३३.५ किमी लांबीचा मेट्रो-३ प्रकल्प, ज्याला ‘अक्वा लाईन’ म्हटलं जातं, हा ३० सप्टेंबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनासाठी सज्ज होत आहे. कफ परेड ते आरे अशा २७ स्थानकांमधून धावणाऱ्या या भूमिगत मार्गामुळे मुंबईतील व्यवसायिक केंद्रे, शैक्षणिक संस्था, आरोग्यसेवा केंद्रे, धार्मिक व सांस्कृतिक स्थळांना एकाच धाग्यात जोडले जाणार आहे.
या मार्गाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शहरातील प्रमुख उद्योग व आर्थिक क्षेत्रांशी थेट जोडणी. कफ परेड, चर्चगेट आणि फोर्ट या दक्षिण मुंबईतील व्यावसायिक पट्ट्यांना थेट बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) या उभरत्या आर्थिक केंद्राशी जोडले जाणार आहे. सीप्झ या महत्त्वाच्या औद्योगिक क्षेत्राला देखील हा मार्ग स्पर्श करत असल्याने रोजच्या लाखो प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे.
व्यवसायापुरताच नव्हे तर धार्मिक व सांस्कृतिक ठिकाणांनाही ही लाईन सहज पोहोच देणार आहे. प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मीतील हाजी अली दर्गा, तर बांद्र्यातील माऊंट मेरी बॅसिलिका येथे भक्त अधिक सोप्या व आरामदायी प्रवासातून पोहोचू शकतील. नवरात्री, गणेशोत्सव किंवा इतर सणांच्या काळात कलबादेवी, गिरगाव व वर्ली स्थानकांवर मोठी गर्दी अपेक्षित आहे. तसेच गेटवे ऑफ इंडिया, नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) यांसारख्या ऐतिहासिक व सांस्कृतिक केंद्रांनाही या मार्गामुळे प्रोत्साहन मिळणार आहे.
शैक्षणिक संस्था व आरोग्य केंद्रांनाही थेट लाभ होणार आहे. सेंट झेवियर्स, गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, कलीना विद्यापीठ यांसारख्या नामांकित महाविद्यालयांबरोबर हिंदुजा, नायर व वॉकहार्ट रुग्णालयांपर्यंत सहज पोहोच साधता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, रुग्ण व आरोग्यसेवक यांना मोठा दिलासा मिळेल.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) च्या माहितीनुसार, या मार्गावर दररोज साडेसहा लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतील असा अंदाज आहे. वातानुकूलित कोचेस, आधुनिक सुरक्षा यंत्रणा आणि इतर मेट्रो मार्गांशी अखंड जोडणीमुळे मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीला एक नवा कणा मिळणार आहे.अक्वा लाईन सुरू झाल्यानंतर मुंबईकरांना वाहतुकीच्या गर्दीपासून मोठा दिलासा मिळेल आणि उद्योग, श्रद्धा, संस्कृती व शिक्षण यांना जोडणारा एक आधुनिक व सोयीस्कर दुवा शहराला प्राप्त होणार आहे.
Leave a Reply