मुंबई : मुंबईतील फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ठाणे खाडी परिसरातील खारफुटी आणि चिखलपट्ट्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अमेझॉनने १.२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (१०.४७ कोटी रुपये) गुंतवण्याची घोषणा केली आहे.
अमेझॉन हा प्रकल्प हेस्टन रिजनरेशन या सामाजिक उपक्रम आणि पर्यावरण पुनरुज्जीवन संस्था यांच्या सहकार्याने राबवणार आहे. या गुंतवणुकीतून ठाणे खाडी परिसरातील कचरा व्यवस्थापन, स्वच्छता अभियान आणि गुजरातमध्ये खारफुटी लागवड यांसाठी निधी दिला जाणार आहे. हा प्रकल्प अमेझॉनच्या “$100 दशलक्ष राईट नाऊ क्लायमेट फंड” अंतर्गत येतो, जो जैवविविधता आणि निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत आहे. ठाणे खाडी आणि आसपासचा परिसर दरवर्षी सुमारे १० लाख स्थलांतरित फ्लेमिंगो पक्ष्यांसह १८० हून अधिक पक्षीप्रजातींचे निवासस्थान आहे. या ठिकाणी १५० टन प्लास्टिक कचरा हटवणे आणि फ्लेमिंगोंच्या अन्नासाठी महत्त्वाच्या जागांवर पुनर्लागवड करणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प केवळ पर्यावरण सुधारण्यासाठी नाही, तर ठाणे खाडी किनारी असलेल्या झोपडपट्टीवासीयांसाठीही लाभदायी ठरणार आहे. परिसराची स्वच्छता आणि पुनरुज्जीवन झाल्यास स्थानिक रहिवाशांना अधिक स्वच्छ आणि निरोगी वातावरण लाभेल. राष्ट्रीय महासागरीय आणि वातावरणीय प्रशासनाच्या अहवालानुसार, खारफुटीचे झाड एका हेक्टर क्षेत्रात उष्णकटिबंधीय जंगलांपेक्षा १० पट अधिक प्रमाणात कार्बन शोषू शकते आणि साठवू शकते. त्यामुळे हा प्रकल्प हवामान बदलावर नियंत्रण ठेवण्यासही मदत करणार आहे. गुजरातमधील ग्रामीण भागात विशेषतः महिलांच्या नेतृत्वाखालील वृक्षलागवड गटांसाठी हा प्रकल्प रोजगाराच्या संधी निर्माण करणार आहे.”मुंबईतील फ्लेमिंगो अधिवासाचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे केवळ जैवविविधतेसाठी नव्हे, तर त्या परिसरावर अवलंबून असलेल्या स्थानिक समुदायांसाठीही आवश्यक आहे,” असे अमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष अभिनव सिंग यांनी सांगितले.हेस्टन रिजनरेशनच्या इंडिया शाखेच्या सह-संस्थापक आणि आलापच्या संचालिका शीबा सेन यांनी या प्रकल्पाच्या महत्त्वावर प्रकाश टाकताना सांगितले की, “अमेझॉन आणि हेस्टन रिजनरेशन यांचे हे सहकार्य मुंबईच्या पर्यावरणासाठी एक गेम चेंजर ठरेल. ठाणे खाडीतील प्रदूषण हटवण्याबरोबरच महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.”शोअरलाइन हॅबिटॅट्स अँड टेन्जिबल इन्कम्ससाठी मॅन्ग्रोव्ह इनिशिएटिव्ह या सरकारी उपक्रमाशी सुसंगत असलेल्या या प्रकल्पाअंतर्गत ३,७५,००० खारफुटी झाडे आणि झुडुपे लावली जाणार आहेत, जेणेकरून फ्लेमिंगो आणि इतर स्थलांतरित पक्ष्यांचे निवासस्थान सुरक्षित राहील.
हा उपक्रम केवळ फ्लेमिंगो आणि पर्यावरण संवर्धनासाठीच नव्हे, तर प्रदूषण नियंत्रण, स्थानिक समुदायांचा विकास आणि जैवविविधतेच्या संरक्षणासाठीही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अमेझॉन आणि हेस्टन रिजनरेशन यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मुंबईतील निसर्गसंपत्तीचे जतन होईल आणि भविष्यातील पिढ्यांसाठी एक स्वच्छ आणि समृद्ध पर्यावरण निर्माण होईल.

मुंबईतील फ्लेमिंगो अधिवास संरक्षणासाठी अमेझॉनची १०.४७ कोटींची गुंतवणूक
•
Please follow and like us:
Leave a Reply