मुंबई: मुंबई विद्यापीठाने लाखो विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांवर ‘मुंबई’ या नावाच्या स्पेलिंगमध्ये झालेल्या गंभीर चुकीबद्दल कंत्राटदाराला दणका दिला आहे. विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर केलेल्या कारवाईत, कंत्राटदाराला एकूण कराराच्या २०% किंवा १० लाख रुपये, यापैकी जी रक्कम अधिक असेल, तो दंड ठोठावण्यात आला आहे. यामुळे विद्यापीठाची मोठी नाचक्की झाली असून, विद्यार्थ्यांमध्येही संतापाचे वातावरण आहे. गेल्या ७ जानेवारी रोजी मुंबई विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ पार पडला होता, ज्यात सुमारे १.२५ लाख विद्यार्थ्यांना पदव्या वितरित करण्यात आल्या. मात्र, कॉलेजांकडून पदव्या वितरीत झाल्यानंतर विद्यापीठाच्या बोधचिन्हावरील ‘मुंबई’च्या स्पेलिंगमध्ये ‘मुबइ’ अशी चूक झाल्याचे निदर्शनास आले. या चुकीमुळे विद्यापीठाला विद्यार्थ्यांकडून पदवी प्रमाणपत्रे परत घ्यावी लागली, ज्यामुळे विद्यापीठाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला.
या गंभीर चुकीची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने कंत्राटदाराला जबाबदार धरले आहे. विद्यापीठाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटदाराने पहिल्या टप्प्यातील पदव्यांमध्ये कोणतीही चूक केली नव्हती. परंतु, दुसऱ्या टप्प्यातील छपाई करण्यापूर्वी कंत्राटदाराने त्याची प्रत विद्यापीठाकडून तपासली नाही आणि तशीच छपाई केली. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली, मात्र अहवाल गोपनीय असल्याचे कारण देत परिषदेच्या सदस्यांना तो नाकारण्यात आला. युवासेनेच्या नेत्या आणि व्यवस्थापन परिषद सदस्य ॲड. शीतल शेठ-देवरुखकर यांनी, विद्यापीठाच्या इतिहासात कधीही असे घडले नाही असे म्हटले असून, विद्यापीठ कोणाला तरी पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे.
युवासेना नेते आणि सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी विद्यापीठाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केवळ कंत्राटदाराला दंड करून जबाबदार अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यापीठाने दंड वसूल केला असला तरी, या चुकीमुळे गेलेली पत कशी भरून निघणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला असून, या प्रकरणात जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
Leave a Reply