मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत तयारी पूर्ण केली असून येत्या काही दिवसांत औपचारिक घोषणा करण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे.
राज्यातील २४८ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींचा कार्यकाळ संपलेला आहे. त्यामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांपूर्वी नगरपालिकांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेऊन निवडणुकीसाठीच्या तयारीचा आढावा घेतला. राज्य निवडणूक आयुक्त किशोर देशमुख आणि सचिव सुनील काकडे यांनी या बैठकीत आवश्यक दिशा-निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक अडचणी, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान आणि मतदार यादी अद्ययावत करण्यासंबंधी माहिती सादर केली.
दरम्यान, अतिवृष्टी आणि पुरामुळे ग्रामीण भागात झालेल्या नुकसानीचा विचार करून आयोगाने आधी नगरपालिका निवडणुका घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेक ठिकाणी प्रशासन अद्याप पुनर्वसन आणि मदतकार्यांमध्ये गुंतलेले असल्याने त्या निवडणुका थोड्याशा उशिराने घेण्यात येतील.
संभाव्यतेनुसार, नोव्हेंबर अखेरीस मतदान होण्याची शक्यता असून, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर केले जाऊ शकतात. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी या पार्श्वभूमीवर तयारी सुरू केली असून आगामी दिवसांत राज्यात निवडणूक प्रचाराची धामधूम सुरू होणार आहे.


Leave a Reply