बिहारमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत असतानाच, केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्या बहिणीच्या कुटुंबात एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर राय यांच्या दोन भाच्यांनी एकमेकांवर थेट गोळीबार केला. या गोळीबारात विश्वजित यादव याचा मृत्यू झाला असून, जयजीत यादव आणि त्यांची आई हिना देवी गंभीर जखमी झाले आहेत. नवगछिया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबातील नळाच्या पाण्यावरून दोन भावांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि काही क्षणांतच जयजीत आणि विश्वजितने एकमेकांवर गोळ्या झाडल्या. गोळीबारात त्यांची आई हिना देवीही जखमी झाली.
जयजीतने विश्वजितवर गोळी झाडली, मात्र विश्वजितनेही प्रत्युत्तर देत जयजीतवर गोळ्या झाडल्या. याच गदारोळात त्यांची आई हिना देवी हिलाही गोळी लागली.
जखमी अवस्थेत या तिघांनाही रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वाटेतच विश्वजितचा मृत्यू झाला. तर जयजीत आणि हिना देवी यांच्यावर भाजपा आमदार डॉ. एन. के. यादव यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विश्वजित आणि जयजीत यादव हे नवगछिया येथील जगतपुर गावामध्ये एकाच कुटुंबात राहत होते आणि शेती करून उदरनिर्वाह करत होते. मात्र, एका किरकोळ कारणावरून इतका मोठा वाद झाला की त्याचा शेवट थेट रक्तपाताने झाला.पोलिसांनी मृत विश्वजितचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.
Leave a Reply