ताथवडेतील १५ एकर शासकीय जमीन परस्पर विक्री; पुण्यात पुन्हा एकदा जमीन घोटाळा उघड

पुणे : राज्यात शासकीय जमिनींच्या गैरव्यवहारांच्या मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीत. पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीशी संबंधित अठराशे कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याच्या प्रकरणानंतर आता पुण्यात आणखी एक मोठा जमीन घोटाळा समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील ताथवडे परिसरात पशुसंवर्धन विभागाची १५ एकर शासकीय जमीन परस्पर विक्री करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

ही जमीन सर्वे नंबर २० अंतर्गत असून, हेरंब गुपचूप नावाच्या व्यक्तीने जानेवारी २०२५ मध्ये या जमिनीची परस्पर विक्री केली असल्याची माहिती मिळाली आहे. पशुसंवर्धन विभागाला न कळवता आणि शासनाच्या परवानगीशिवाय हा व्यवहार केल्याचा आरोप आहे. मुद्रांक शुल्क विभागाकडून ही माहिती पशुसंवर्धन विभागाला कळविण्यात आल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला.

यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांनी तातडीने या संपूर्ण व्यवहाराची तक्रार पुण्याचे विभागीय आयुक्तांकडे केली आहे. सध्या विभागीय आयुक्त आणि पशुसंवर्धन विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून, नेमके कुणाच्या संगनमतातून हा गैरव्यवहार झाला याचा तपास सुरू आहे.

या प्रकरणामुळे प्रशासनातील निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोट्यवधी रुपयांच्या मोक्याच्या शासकीय जागेची परस्पर विक्री कशी झाली, याचे उत्तर आता अधिकाऱ्यांना द्यावे लागणार आहे. पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यानंतर काही दिवसांतच समोर आलेल्या या नव्या प्रकरणामुळे राज्यातील जमीन व्यवहारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यभरात या प्रकरणाने खळबळ उडाली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *