नागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खान याच्या घरावर नागपूर महानगरपालिकेने (NMC) बुलडोझर कारवाई करत मोठी धडक मोहीम राबवली आहे. टेकानाका परिसरात फहीम खानने बांधलेल्या घरात अतिक्रमण आढळल्याने, आज (२४ मार्च) हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. ही कारवाई करण्यापूर्वी महापालिकेने खानच्या कुटुंबाला अधिकृत नोटीस बजावली होती. त्यामुळे या घटनेनंतर फहीम खानच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे.
नागपूर हिंसाचारातील मुख्य सूत्रधार आणि मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम खान याच्या संजयबाग येथील घरावर महानगरपालिकेने ही कारवाई केली. खानने हे घर ३० वर्षांच्या लीजवर घेतले असले तरी, त्यात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम आढळले. त्यामुळे महापालिकेने पहिल्या मजल्यापासून संपूर्ण घर पाडण्याची प्रक्रिया हाती घेतली. कारवाईच्या पार्श्वभूमीवर फहीम खानच्या कुटुंबीयांनी घर रिकामे करून बाहेर पडल्याचे दिसून आले.
या कारवाईदरम्यान कायद्याची अंमलबजावणी आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला. संजयबाग परिसरात बॅरिकेड्स लावण्यात आले असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क आहेत. कारवाई पूर्ण झाल्यानंतर घराचा वीजपुरवठा पूर्णतः खंडित करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
१७ मार्च रोजी नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचार प्रकरणात फहीम खानला अटक करण्यात आली होती. त्याच्यासह आणखी ६ जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान त्याच्या घरातील अनधिकृत बांधकाम उघड झाल्याने महानगरपालिकेने कठोर कारवाई केली. नागपूर प्रशासनाने स्पष्ट संदेश दिला आहे की, कोणताही समाजविघातक घटक कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही आणि समाजाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल.
Leave a Reply