नाना पटोले यांचं दिवसभरासाठी निलंबन, विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार

मुंबई: कालपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याचं दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नाना पटोले यांना मोठा धक्का बसला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पटोले यांचे कामकाज सुरू होताच, पहिल्या तासातच त्यांना दिवसभरासाठी निलंबित केले आहे. सभागृहाच्या अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत म्हणजेच ‘वेल’मध्ये (well of the house) जाऊन त्यांनी गोंधळ घातल्यामुळे अध्यक्षांनी ही कारवाई केली आहे. नाना पटोले यांच्या निलंबनानंतर सभागृहात एकच खळबळ उडाली. या कारवाईचा निषेध करत महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी आणि इतर विरोधी पक्षांनी कामकाजावर बहिष्कार टाकला.

भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्यावरुन नाना पटोले आक्रमक झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमचे बाप असतील, शेतकऱ्यांचे बाप नाहीत असं म्हणत नाना पटोले आक्रमक झाले. लोणीकर यांनी केलेला अपमान आता अन्नदाता शेतकरी सहन करणार नाही. मुख्यमंत्र्‍यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. हे वक्तव्य चालणार नाही, हे वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं पटोले म्हणाले. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोलेंना ही भाषा तुमच्याकडून असं अपेक्षित नाही म्हणत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावर आक्रमक झालेले नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हौदात उतरले. त्यावेळी राहुल नार्वेकर यांनी कामकाज पाच मिनिटांसाठी स्थगित केलं.

कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोलेंना हे वागणं शोभणीय नसल्याचं म्हटलं. नाना पटोले हे सभागृहाचे माजी अध्यक्ष राहिले आहेत. ते जागेवर बसले नाहीत, तर मला पुढची करावाई करावी लागेल असं अध्यक्ष म्हणाले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी अध्यक्षांवर धावून जाणं चुकीचं आहे असं म्हटलं. यावेळी नाना पटोले पुन्हा एकदा हौदात उतरले. त्यावेळी राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांना आजच्या दिवसासाठी नाना पटोले यांना निलंबित केलं.

विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभात्याग करत सरकारच्या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला. पटोले यांच्या निलंबनामुळे सभागृहातील वातावरण अधिकच तप्त झाले आहे. अध्यक्षांनी शिस्तभंग केल्याबद्दल हे निलंबन केल्याचे स्पष्ट केले आहे, तर विरोधकांनी लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. यामुळे, पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाचं सभागृहाचे कामकाज चांगलेच वादळी ठरले आहे. या घटनेमुळे आता पुढील कामकाज कसे चालणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *