राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक क्रांतिकारी टप्पा गाठण्यात आला असून, नाशिकमधील शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांचा किंवा दलालांचा हस्तक्षेप न करता थेट खाडी देशांत कांद्याची निर्यात सुरू केली आहे. गुरुवारी (दि. १८ एप्रिल) ३० टन कांद्याचा पहिला टप्पा खाडी देशांकडे रवाना झाला, तर एकूण २,००० टन कांद्याची थेट निर्यात करण्यात येणार आहे. ही ऐतिहासिक निर्यात प्रक्रिया ‘महाफेडरेशन ऑफ फार्मर प्रोड्युसर कंपनीज’ (MahaFPC) या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या राज्यस्तरीय संघटनेच्या माध्यमातून राबवली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना व्यापारी-मध्यस्थांच्या नियंत्रणातून मुक्तता मिळून थेट नफ्याचा वाटा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील शेतकरी एकनाथ सनप यांनी सांगितले, “थेट निर्यातीचा मार्ग खुला झाल्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःची बाजारपेठ मिळणार आहे. दर स्थिर राहिल्यास आणि गुणवत्ता राखल्यास उत्पादनातही नवनवीन प्रयोग करता येतील.” सनप हे ‘गोडा धरना शेतकरी उत्पादक कंपनी’चे संचालक असून, त्यांनी स्पष्ट केले की निर्यातीयोग्य कांद्याचा आकार ५५ मिमी ते ६० मिमी असावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांकडून आता दर्जेदार उत्पादन, ग्रेडिंग व पॅकिंगकडे विशेष लक्ष दिलं जात आहे.
१० उत्पादक कंपन्यांचा सहभाग महाफेडचे व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात यांनी सांगितले की, नाशिक, पुणे, धाराशिव आणि अहिल्यनगर जिल्ह्यांतील १० शेतकरी उत्पादक कंपन्या या निर्यातीमध्ये सहभागी आहेत. “ही पहिली वेळ आहे की शेतकरीच थेट निर्यातदार म्हणून पुढे येत आहेत. यामुळे मूल्यवर्धनाची सर्व प्रक्रिया शेतकऱ्यांच्या हाती राहणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
महाफेडने १९,००० टन क्षमतेची साठवणूक साखळी उभारली असून, त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांना निर्यातीसाठी होणार आहे. थोरात यांनी पुढील उद्दिष्ट म्हणून, “कांद्याप्रमाणेच फळभाज्या आणि फळांचीही थेट निर्यात शेतकऱ्यांमार्फत करण्याचा मानस आहे,” असे नमूद केले. यंदा कांद्याबरोबरच २,५०० डझन देवगड हापूस आंबे खाडी देशांमध्ये थेट निर्यात होणार आहेत.
भारतीय कांद्याला सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कतार, कुवैत, ओमान आणि बहरीन या देशांत कायमस्वरूपी मागणी असते. तसेच श्रीलंका, मलेशिया आणि बांगलादेश या देशांमध्येही तो मोठ्या प्रमाणावर निर्यात होतो. सध्या बांगलादेश सरकारने जून २०२५ पर्यंत भारतीय कांद्याच्या आयातीवर बंदी घातली आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
• नाशिकच्या शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांशिवाय थेट कांद्याची निर्यात
• एकूण २,००० टन कांद्याची खाडी देशांत निर्यात
• शेतकऱ्यांना अधिक नफा व मूल्यवर्धनाची संधी
• महाफेडकडून १९,००० टन क्षमतेची साठवणूक साखळी
• देवगड हापूस आंब्यांचीही थेट निर्यात सुरू
Leave a Reply