मुंबई -धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे. नुकतंच मुंडेचे स्वीय सहायक हे राजीनाम्याचं पत्र घेऊन सागर बंगल्यावर दाखल झाले होते. संतोष देशमुख हत्येनंतर मागील 3 महिन्यापासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. अखेर संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर सोमवारी रात्री उशिरा बैठक पार पडली. या बैठकीत धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला सांगितला होता. अखेर आज त्यांनी आपल्या पीएच्या मार्फत आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून मुख्यमंत्री जेंव्हा विधिमंडळाच्या परिसरात दाखल झाले तेंव्हा त्यांनी राजीनाम्याबद्दल माहिती दिली. “धनंजय मुंडे यांनी राजीनामा माझ्याकडे दिला असून तो मी स्वीकारला आहे. पुढच्या कारवाईसाठी राजीनामा राज्यपालांकडे पाठवण्यात आला असून मुंडेंना मंत्रीपदापासून मुक्त करण्यात आलं आहे”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यादरम्यान विरोधी आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर मोठ्याप्रमाणात घोषणाबाजी केली.
राजीनामा दिल्यानंतर काय म्हणाले धनंजय मुंडे?
“बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे, असं धनंजय मुंडेंनी फेसबुक पोस्ट करून सांगितलं आहे.
आता पुढे काय?
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तर चार्जशीट अपडेट करावी, असं आमदार सुरेश धस म्हणाले. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडर यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले होते. ज्यामध्ये कृषी खात्यात आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप देखील त्यांच्यावर झाला होता. त्यामुळे आता यापुढे त्या अँगलने चौकशी होते का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हत्याकांडाचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्र हळहळलं
संतोष देशमुख केसची चार्जशिट गुन्हे अन्वेष विभागाने कोर्टात दाखल केली आहे. ज्यामध्ये हत्याकांडदरम्यानचे 15 व्हिडीओ आणि काही फोटो आरोपपत्रात सामील करण्यात आले आहे. त्यापैकी काही फोटो माध्यमातून समोर आले होते. ज्यामध्ये संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण केली जातेय. त्याचबरोबर त्यांना निर्वस्त्र करून टॉर्चर केलं जातंय. इतकंच नाही तर एका फोटोत आरोपी संतोष देशमुख यांच्या तोंडावर लघुशंका करत असल्याचं दिसत आहे. त्यांना इतकी मारहाण करण्यात आली आहे की त्यांचं तोंड पूर्ण सुजलेले आहे. हे फोटो समोर आल्यानंतर समाजतून हळहळ व्यक्त केली जात असून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. या तीव्र प्रतिकयेनंतर अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी राजीनामा देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
नेमकं प्रकरण काय?
मागील 3 महिन्यापासून संतोष देशमुख हत्याप्रकरण राज्यभर गाजत आहेत. हा नेमका प्रकरण काय, हे आदी जाणून घेऊया.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं.
गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून या प्रकरणातील आरोपींनी कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे. विरोधकांनीही या प्रकरणावरून टीकेची झोड उडवली आहे. सध्या गुन्हे अन्वेषण विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे. अशातच, देखमुख यांना अमानुषपणे मारहाण करतानाचे फोटो पुढे आले असून वातावरण चिघळण्याची शक्यता आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी आज निषेधार्थ बंद पाळण्यात येणार असल्याच्या बातम्या समोर येत आहे.
हत्येतील आरोपी वाल्मिक मुंडेंच्या जवळचा
संतोष देशमुख हत्येतील आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे. त्यांचे सर्व कारभार तोच सांभाळतो. त्यामुळे पहिल्या दिवसापासून धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळे आरोपासह राजीनाम्याची मागणी होत होती. अखेर हत्येचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनामा घेण्यात यावा, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे आज राजीनामा देणार आहेत.
Leave a Reply