लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने जबरदस्त यशाची नोंद केली होती. मात्र, विधानसभेच्या रणांगणात महायुतीने जोरदार मुसंडी मारत महाविकास आघाडीला चीतपट केलं. त्यानंतर आघाडीसमोर धक्क्यांची मालिकाच सुरू झाली आहे.
शहापूर तालुक्यातील माजी आमदार व शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते पांडुरंग बरोरा यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चेला गेल्या काही दिवसांपासून उधाण आले होते. अखेर त्या चर्चांना पूर्णविराम देत, आज त्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या सोबत शरद पवार गटातील अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये उडी घेतली असून, यामुळे शहापुरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
पांडुरंग बरोरा – राजकीय प्रवासाचा थोडक्यात आढावा
पांडुरंग बरोरा हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचेच कार्यकर्ते. त्यांच्या वडिलांनीही याच पक्षातून आमदारकी केली होती. बरोरा यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषदेपासून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर ते आमदारही झाले. मात्र, आमदारकीच्या कालावधीत त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत राजकीय वळण घेतलं. पुढे 2024 च्या निवडणुकीसाठी त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाची वाट धरली. पण या निवडणुकीत त्यांचा थोडक्याच मतांनी पराभव झाला. त्यानंतर ते राजकारणातून काहीसे लांब गेले. परंतु अखेर त्यांनी आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ट करत आज भाजपमध्ये प्रवेश केला.
या प्रवेशसोहळ्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, मालेगाव येथील हिरे कुटुंबातील प्रसाद हिरे, संजय घाडगे, पांडुरंग बरोरा आणि शिवाजी देशमुख यांचाही पक्षप्रवेश झाला आहे. शिवाय, विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूरमधील 12 नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.बावनकुळे यांनी स्पष्ट इशारा दिला की, काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर गळती सुरू आहे. आगामी काळात काँग्रेसमधून अनेक धक्कादायक पक्षप्रवेश पाहायला मिळतील.
Leave a Reply