नेरळ-माथेरान मिनी ट्रेन अखेर धावणार; पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण

माथेरान : : दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू होणारी ऐतिहासिक नेरळ-माथेरान मिनी ट्रेन यंदा अखेर १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. अनियमित पावसामुळे यंदा ट्रेन वेळेवर सुरू होऊ शकली नव्हती. पावसामुळे रेल्वेमार्गावर झालेल्या नुकसानामुळे आणि सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने काही काळासाठी सेवा स्थगित ठेवली होती. मात्र सर्व दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर अखेर ही पारंपरिक ट्रेन धावण्यासाठी सज्ज झाली आहे.

नेरळ ते माथेरान हा सुमारे २१ किलोमीटर लांबीचा डोंगराळ आणि निसर्गरम्य रेल्वेमार्ग आहे. या मार्गावर दऱ्या, कडे आणि घनदाट जंगलातून ट्रेनचा प्रवास हा पर्यटकांसाठी एक वेगळाच अनुभव ठरतो. माथेरानच्या पर्यटन अर्थव्यवस्थेत या मिनी ट्रेनचं विशेष स्थान असून, देश-विदेशातून हजारो पर्यटक दरवर्षी या रेल्वे प्रवासाचा आनंद घेतात.

१९०७ साली ब्रिटिश काळात सर अ‍ॅडमजी पिरभॉय यांनी ही ट्रेन सुरू केली होती. तब्बल शंभराहून अधिक वर्षांपासून ही परंपरा सुरू असून, दरवर्षी पावसाळ्यानंतर ट्रेन बंद करून दसऱ्याच्या सुमारास पुन्हा सुरू केली जाते. मात्र यंदा पावसाचा अतिरेक आणि भू-स्खलनामुळे ही सेवा उशिरा सुरू झाली.

दरम्यान, अमन लॉज ते माथेरान ही शटल सेवा सुरू असल्याने पर्यटकांना काही प्रमाणात दिलासा मिळत होता. आता मिनी ट्रेन सुरू झाल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

रेल्वे प्रशासनाने सर्व दुरुस्ती आणि सुरक्षा तपासणी पूर्ण केली असून, ट्रेन सेवा सुरळीत सुरू होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वाती नीलम यांनी दिली.

मिनी ट्रेनचा प्रवास हा केवळ वाहतुकीचे साधन नसून माथेरानच्या पर्यटनाचा आत्मा मानला जातो. त्यामुळे तिच्या पुनर्प्रारंभामुळे पर्यटक आणि स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *