विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय जनता पक्षाने आता लक्ष केंद्रित केले आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर. त्यासाठी पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर मोठे बदल घडवून आणण्याचा निर्धार केला असून, २२ एप्रिलपासून नव्या जिल्हाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. ही माहिती भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.
संघटन पर्वात दुसरा टप्पा;निरीक्षकांची नियुक्ती पूर्ण
या निवडीसाठी जिल्हानिहाय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. संपूर्ण प्रक्रिया लोकशाही पद्धतीने पार पडणार असून, भाजपमध्ये तरुणांना अधिक संधी देण्यावर भर दिला जाणार आहे.
चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, २० एप्रिल रोजी राज्यातील सर्व १,१९६ मंडल अध्यक्षांची निवडणूक निरीक्षकांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे. या निवडींमुळे पक्षाच्या तळागाळातील नेतृत्वाला नवे बळ मिळणार आहे.या संघटन पर्वात भाजपने दीड कोटींहून अधिक प्राथमिक सदस्य आणि १ लाख ३४ हजारांहून अधिक सक्रिय सदस्यांची नोंदणी करून मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे, अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी दिली.सध्या राज्यात ७० टक्के बूथ समित्यांचे गठन पूर्ण झाले असून, येत्या २२ एप्रिलपर्यंत एक लाख बूथ समित्यांचे निर्माण हे उद्दिष्ट भाजपने ठरवले आहे.
चार महिन्यात ७ कोटींची जमीन ५८ कोटींना! रॉबर्ट वाड्रा यांच्या व्यवहारावर चौकशी अनिवार्य – सिंह
सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी एका कंपनीकडून ७ कोटी रुपयांना जमीन खरेदी केली आणि अवघ्या चार महिन्यांत तीच जमीन पुन्हा त्याच कंपनीला ५८ कोटी रुपयांना विकली. या संशयास्पद व्यवहारामुळे चौकशी टळणे अशक्यच आहे, असे स्पष्ट मत सिंह यांनी व्यक्त केले. चार महिन्यांत जमिनीच्या किमतीत एवढी प्रचंड वाढ होणे आणि त्याच कंपनीकडून खरेदी-विक्रीचा व्यवहार होणे हे अत्यंत संशयास्पद आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या आर्थिक उलाढालींची चौकशी होणारच, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
Leave a Reply